नवी दिल्ली – लडाख सीमेवर चीन आणि भारतीय सैनिकातील संघर्षाचा मोठा फटका चीनला सहन करावा लागणार आहे. सिग्नलिंग आणि टेलिकम्युनिकेशनचा एका मोठा प्रकल्प चीनी कंपनीच्या हातातून निसटला आहे. भारतीयरेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने चीनची कंपनी नॅशनल रेल्वे रिसर्च अँन्ड डिझाईन इंस्टीट्यूट ऑफ सिग्नल अँन्ड कम्युनिकेशनसोबतचा करार रद्द केला आहे.
डीएफसीसीआयएलने याबाबत घोषणा करताना चीनी कंपनीच्या खराब कामगिरीचा हवाला दिला आहे. डीएफसीसीआयएलने २०१६ मध्ये प्रोजेक्ट कानपूर रेल्वे स्टेशन पासून दिनदयाल उपाध्याय रेल्वे स्टेशनच्या दरम्यान सिग्नल आणि टेलिकम्युनिकेशनचं काम एका चीनी कंपनीला दिलं होतं. हा प्रकल्प ४७१ कोटींचा होता. पण ४ वर्षात कंपनीने फक्त २० टक्केच काम केले, कंपनीच्या कामाची गती पाहून भारतीय रेल्वेने हे कंत्राट रद्द केले आहे.
सध्या देशभरात चीनविरोधात संतापाची लाट आहे, चीन आणि भारत यांच्यातील तणाव वाढला असून गलवान खोऱ्यात दोन्ही देशाच्या सैनिकात तुफान झटापट झाली. यामध्ये भारताचे २० जवान शहीद झाले तर चीनच्या ४० हून अधिक सैनिकांनाही मोठी हानी झाली. देशाचे जवान शहीद झाल्याने लोकांमध्ये चीनबद्दल राग निर्माण झाला आहे. यामुळे अनेक ठिकाणी चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचं काम सुरु आहे. काही ठिकाणी आंदोलन सुरु आहेत तर केंद्रानेही एमटीएनएल आणि बीएसएनएल यांनाही चीनी उपकरणं न वापरण्याचे आदेश दिले आहेत.
चीनसोबतचा वाढता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींन १९ जून रोजी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. तर आत्मनिर्भर भारत या माध्यमातून चीनची भारतीय बाजारातील मक्तेदारी मोडून काढण्यासाठी केंद्र सरकारने पावलं उचलली आहेत. कोणताही माल आपल्याला बाहेरच्या देशातून आयात करण्यापेक्षा तो माल देशात बनवून त्याचा निर्यात केली जावी यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. चीन हा भारतीय बाजारपेठेतील मोठा गुंतवणूकदार आहे. भारतीय बाजारपेठेत चीनी वस्तू मोठ्या प्रमाणात विकल्या जातात. पण सध्याच्या काळात चीन आणि भारत यांच्यात तणाव असल्याने भारतीयांच्या मनात चीनविषयी चीड निर्माण झाली आहे. त्यामुळे चीनसोबत कोणताही व्यवहार करु नये अशी भूमिका सर्वसामान्य लोकांची आहे.