नवी दिल्ली - लडाखच्या गलवान सीमेवर भारत आणि चीन यांच्यात झालेल्या संघर्षात देशाचे २० जवान शहीद झाले. चीनच्या अशाप्रकारे भारताला धोका दिल्यानं संपूर्ण देशात चीनविरोधात संतापाची लाट आहे. भारताने अद्यापही या प्रकरणी थेट प्रतिक्रिया दिली नाही. पण देशाच्या शहीदांचे बलिदान व्यर्थ न जाण्यासाठी चीनचा बदला घेण्याची तयारी सुरु केली आहे. पेइचिंगच्या या करकुतीविरोधात भारत मोठ्या तयारीत असल्याची सूत्रांची माहिती आहे.
१९७५ नंतर भारत आणि चीन यांच्यातील संघर्ष अत्यंत गंभीरस्थितीत येऊन पोहचला आहे. चीनच्या विश्वासघाताविरोधात भारताने चीनविरोधात रणनीती आखली आहे. भारत सैन्यापेक्षा चीनला आर्थिक आघाडीवर घेरण्याच्या तयारीत आहेत. भारत ही सर्वात मोठी बाजारपेठ असून या बाजारपेठेतून चीनच्या आर्थिक नाड्या तोडण्याची तयारी भारताने केली आहे. त्यामुळे चीनला मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.
दोन्ही देशांमधील वाढता तणावाच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी सरकारने चीनला घेरण्याची तयारी केली आहे. संयुक्त राष्ट्र संघातही चीनला धडा शिकवण्याच्या मानसिकता भारताने केली आहे. आतापर्यंत चीनच्या गुंतवणुकदारांना भारतात सहज परवानगी मिळत होती, त्याचा वेग आता कमी केला जाईल. चीनी कंपन्यांना सरकारी अथवा खासगी क्षेत्रात अडचणी निर्माण करण्यात येतील. त्याचसोबत सर्वात महत्त्वाचं म्हणजे चीनची मोठी मोबाईल कंपनी हुवेईला भारतात ५ जी मार्केटमध्ये प्रवेश मिळणं जवळपास कठीण झालं आहे.
असा झाला चीन आणि भारत यांच्यात संघर्ष?
सोमवारी सकाळी ब्रिगेड कमांडरसोबत स्थानिक कमांडर स्तरीय बैठक झाली. संध्याकाळी भारतीय लष्कारी अधिकाऱ्यांची टीम गलवान खोऱ्यात पीपी १४ याठिकाणी पोहचले ज्याठिकाणाहून चीनच्या सैनिकांना मागे जायचं होतं, भारतीय अधिकारी आणि त्यांच्या जवानांवर दगड आणि लोखंडाच्या रॉडने हल्ला केला. त्यामुळे भारतीय सैनिकांनीही सतर्कता बाळगत त्याला उत्तर दिलं. मोठ्या संख्येने भारताचे सैनिक त्याठिकाणी पोहचले, रात्री उशिरापर्यंत दोन्ही सैनिकात संघर्ष सुरु होता. यात घटनेत २० जवान शहीद झाले तर चीनच्या गंभीर जखमी पकडून साधारण ४३ सैनिकांचा मृत्यू झाल्याची बातमी मिळाली.