नवी दिल्ली – चीनने आपल्या सीमेत घुसखोरी केली नाही, ना आपल्या कोणत्याही पोस्टवर कब्जा केला आहे. लडाखमध्ये भारताचे २० वीर जवान शहीद झाले, पण भारत मातेवर ज्यांनी डोळे वटारुन पाहिले त्यांना धडा शिकवून गेले. जल-थल-वायू सेना आपल्या देशाच्या रक्षणासाठी जे काही करायचं आहे ते करत आहे. आज आपल्या देशाची अशी क्षमता आहे कोणीही देशाच्या एक इंच जमिनीकडे वाकड्या नजरेने पाहू शकणार नाही असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वपक्षीय बैठकीत चीनला दिला आहे.
यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले की, मागील वर्षी देशाने आपल्या सीमेच्या संरक्षणासाठी सीमा परिसरात पायाभूत सुविधा वाढवण्यावर भर दिला आहे. नवीन बनलेल्या सुविधांमुळे विशेष करुन एलएसीजवळ आपल्या सैन्याची पेट्रोलिंग क्षमता वाढली आहे. त्यामुळे ज्या क्षेत्रावर पहिले आपली नजर जात नव्हती त्याठिकाणी आपले जवान चांगल्यारितीने मॉनिटर करु शकत आहेत.
आतापर्यंत ज्यांना कोणी विचारत नव्हतं. ना कोणी रोखत होतं. आता आपले जवान प्रत्येक हालचालींवर त्यांना रोखत आहेत त्यामुळे तणाव वाढला आहे असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत सर्वपक्षीय नेत्यांना आश्वस्त करतो की, देशाचे सैनिक भारताच्या सीमेचं रक्षण करण्यासाठी सक्षम आहेत. सैन्यदलांना परिस्थितीनुसार निर्णय घेण्याचे सर्वाधिकार दिले आहेत. जे काही गरजेचे आहे ते करा असं सांगण्यात आलं आहे.
भारत कधीही कोणाच्या दबावाखाली येणार नाही. देशाच्या रक्षणासाठी कटीबद्ध आहोत. निश्चितपणे चीनद्वारे एलएसीवर जे काही सुरु आहे त्यामुळे देशात आक्रोश आहे. हीच भावना सर्वपक्षीय बैठकीत आपल्या चर्चेदरम्यान पाहायला मिळाली असं नरेंद्र मोदी म्हणाले.