नवी दिल्ली – लडाख सीमेवर भारत आणि चीन यांच्यात झालेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशात सध्या तणावपूर्ण स्थिती आहे. सोमवारी रात्री दोन्ही देशातील सैनिकांच्या झटापटीत देशाचे २० जवान शहीद झाले तर चीनच्या ४३ सैनिकांचीही मोठी हानी झाली. भारत आणि चीन यांच्यातील तणावामुळे सध्या देशभरात चीनविरोधात संतापाची लाट आहे.
भारत आणि चीन यांच्या सैनिकात गलवान खोऱ्यात झटापट झाली. यामध्ये २० जवान शहीद झाले तर इतर ७६ जवान जखमी झाले. सुदैवाने सध्या या जखमींपैकी कोणाचीही प्रकृती गंभीर नाही. न्यूज एजेन्सी एएनआयने भारतीय लष्कराच्या सूत्रांच्या हवाल्याने ही बातमी दिली आहे. भारताचे १८ जवान लेहच्या रुग्णालयात उपचार घेत आहे. पुढील १५ दिवसांत हे जवान पुन्हा ड्युटीवर कार्यरत होतील असं सांगितलं आहे.
तर उर्वरित ५८ जवान इतर रुग्णालयात उपचार घेत आहेत, या सर्व जखमींची प्रकृती स्थिर आहे. या ५८ जवानांना ड्युटीवर पुन्हा परतण्यास एक आठवड्याचा कालावधी जाईल अशी माहिती लष्करातील सूत्रांनी दिली आहे. दरम्यान चीन आणि भारतातील मेजर जनरलांनी सलग तिसर्या दिवशी गलवान वाद सोडविण्यासाठी बैठक घेतली. ही बैठक गुरुवारी सुमारे ६ तास चालली. गलवान व्हॅलीच्या जवळ ही बैठक झाली. यापूर्वी बुधवारी झालेल्या चर्चेत दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांमध्ये कोणताही तोडगा निघाला नाही.
गलवानच्या घटनेसाठी भारताने दोन दिवसांत दुसऱ्यांदा चीनला दोष दिला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, पूर्व लडाखमधील तणाव कमी करण्यासाठी दोन्ही बाजूच्या मुत्सद्दी व सैन्य स्तरीय चर्चा सुरू आहे. ६ जूनला कमांडरांचा संवाद झाला. या बैठकीत सहमती झाली होती, त्याचं पालन चीनने करायला हवं होतं. १५ जूनच्या रात्री जे झालं त्यासाठी चीन जबाबदार आहे. जर त्यांनी उच्चस्तरीय बैठकीत जे ठरलं आहे ते लक्षात ठेवलं असतं तर हे नुकसान झालं नसतं. तसेच २३ जून रोजी रशिया, चीन आणि भारत यांच्या बैठकीत परराष्ट्र मंत्री जयशंकर सहभागी होतील असं परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव म्हणाले आहेत.