- सुरेश एस. डुग्गर जम्मू : लडाखमध्ये एलएसीवर भारत-चीन या दोन्ही देशांदरम्यान निर्माण झालेला तणाव अद्याप कमी झालेला नाही. याचे पडसाद आता सोशल मीडियावरही उमटू लागले आहेत. टिष्ट्वटरवर होणाऱ्या युद्धात एका चिनी अकाऊंटवरून तर भारताला लडाख रिकामे करण्याची धमकी दिली जात आहे, तर भारतीय यूजर टी-९० रणगाड्यांची तैनाती वटवाघळांसाठी असल्याचे सांगत आहेत. एलएसीवरील कब्जा केलेल्या भागावरून चिनी फौजेला मागे हटवण्यासाठीची चर्चेची सहावी फेरी अयशस्वी ठरली आहे. त्यामुळे दोन्ही देशांच्या लष्करांतील वातावरण कडाक्याच्या थंडीतही तापलेलेच असणार आहे, हे स्पष्ट झाले आहे.एलएसीवरील तनातनीमध्ये सध्या काही तणाव नसला तरी सोशल मीडियावर तो जरूर वाढत आहे. लडाखचा तणाव आता कुठे-कुठे परिणाम करीत आहे, ते विविध छायाचित्रांवरून दिसत आहे.लडाख सेक्टरमध्ये एलएसीवर अनेक सेक्टरमध्ये चिनी लष्कराने कब्जा केला आहे व त्या सैन्याला मागे हटवण्यासाठी शनिवारी दौलत बेग ओल्डी (डीबीओ) भागात दोन्ही देशांत मेजर जनरल स्तरावरील चर्चा आयोजित करण्यात आली होती. या सहाव्या फेरीत ८ तास चर्चा चालली. यावेळच्या चर्चेत भारत व चीन दरम्यान पेंगाँग, देपसांग, गोगरा-हॉट स्प्रिंग भागांतील वादग्रस्त मुद्दे निकाली निघू शकले नाहीत. या चर्चेत भारताच्या बाजूचे नेतृत्व तिसºया इन्फन्ट्री डिव्हीजनचे जनरल ऑफिसर कमांडिंग मेजर जनरल अभिजीत बापट यांनी केले. यावेळी चीनने देपसांग व डीबीओ सेक्टरमधील आपले सैनिक मागे हटवावेत व तेथील कामे थांबवावीत, असे भारताने म्हटले . या भागात चीनने हजारो सैनिकांसह मोठ्या प्रमाणात रणगाडे, आर्टिलरी गन तैनात केल्या आहेत.एलएसीवरील अग्रीम भागांमध्ये मोहिमेची निगराणी करणाºया लष्कराच्या सर्व वरिष्ठ कमांडरांनी कायम सतर्कता बाळगावी व चीनच्या कसल्याही आगळीकीला तोंड देण्यासाठी आक्रमक पवित्रा घ्यावा, असे निर्देश लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांनी दिले आहेत. याबरोबरच भारतीय लष्कराने पूर्व लडाखमध्ये व एलएसीवर इतरही संवेदनशील भागांमध्ये कडाक्याच्या थंडीच्या काळात सैनिक व शस्त्रांची विद्यमान संख्या कायम ठेवण्यासाठी विस्तृत योजना तयार केली आहे.भारत-चीनमध्ये का वाढला पुन्हा तणाव?चीनने वादग्रस्त भागांतून सैनिक परत घ्यावेत, अन्यथा कोणत्याही घटनेसाठी तयार राहावे, असे मेजर जनरल अभिजित बापट यांनी ठणकावल्यानंतर तणाव वाढला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देपसांगमध्ये चिनी लष्कराच्या मोठ्या संख्येने असलेल्या उपस्थितीमुळे भारताच्या प्रवेश मार्गांवर व डीजीओ रोड व उत्तरेत काराकोरममध्ये असलेल्या हवाई पट्टीला धोका निर्माण झाला आहे. पीएलएने येथे रणगाडे, तोफा, बंदुकांसह १२,००० हून अधिक सैनिक तैनात केले आहेत. भारतीय लष्कराने या भागात काही ठिकाणी पायदळाच्या तुकड्या व एक ब्रिगेड तैनात केले आहे.
India China FaceOff: आठ तासांच्या चर्चेनंतरही निघाला नाही तोडगा; मुकाबल्याची तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 3:26 AM