नवी दिल्ली: लडाखमध्ये दोन महिन्यांपासून निर्माण झालेला तणाव निवळला आहे. चिनी सैन्य गलवानमधून २ किलोमीटर मागे गेलं आहे. चीन सरकारकडूनदेखील या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे. पूर्व लडाखमधील अनेक पोस्टवरून चिनी सैन्यानं माघार घेतली असून भारतीय जवान परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून निर्माण झालेला तणाव कमी करण्यात सरकारला यश आल्याचं चित्र आहे. यामध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली.पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अत्यंत विश्वासू मानले जाणाऱ्या अजित डोवाल यांनी काल त्यांचे चिनी समकक्ष असलेल्या वांग यी यांच्यासोबत जवळपास दोन तास व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली. या दोघांमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यानंतर आज चिनी सैन्य दोन किलोमीटरपर्यंत मागे सरकलं. त्यामुळे डोवाल आणि वांग यी यांच्यातील चर्चा फलद्रूप ठरल्याचं म्हटलं जात आहे. डोवाल आणि वांग यी यांच्यातील चर्चा अतिशय सौहार्दपूर्ण होती, अशी माहिती सुत्रांनी दिली. भविष्यात पुन्हा गलवानसारखी घटना होऊ नये यासाठी शांतता राखण्याबद्दल दोघांनी चर्चा केली. या चर्चेचा परिणाम आज दिसला.
India China FaceOff: 'ते' दोन तास महत्त्वाचे ठरले; अजित डोवालांनी लडाखमध्ये चीनला झुकवले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2020 3:32 PM