नवी दिल्ली -चिनी सैन्याने केलेला घुसखोरीचा प्रयत्न, गलवानमध्ये भारत आणि चीनच्या सैन्यात झालेल्या झटापटीत भारताच्या २० जवानांना आलेले वीरमरण, वाढत्या तणावादरम्यान दोन्ही देशांनी लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर मोठ्या प्रमाणात तैनात केलेले सैन्य, अशा तणावाच्या पार्श्वभूमीवर एक संसदीय समिती दोन दिवसांचा लडाख दौरा करणार आहे. २८ आणि २९ ऑक्टोबर रोजी हा दौरा होणार असून, ही समिती प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील फॉरवर्ड पोस्टचा दौरा करणार आहे. तसेच अतिथंड तापमान असलेल्या प्रदेशात तैनात असलेल्या जवानांसाठी उबदार कपडे, स्नो गॉगल्सच्या टंचाईचा कॅकच्या अहवालात झालेल्या उल्लेख याबाबतही ही समिती आढावा घेणार आहे.हिंदुस्थान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, या समितीशी संबंधित असलेल्या अधिकाऱ्यांनी आज ही माहिती दिली आहे. काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांच्या अध्यक्षतेखालील पब्लिक अकाऊंट कमिटीचे सदस्य २८-२९ ऑक्टोबरला लेहचा दौरा करणार आहेत, असे या अधिकाऱ्याने सांगितले. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी संसदीय समितीच्या या दौऱ्यास मान्यता दिली आहे. अधीर रंजन चौधरी यांनी गेल्या महिन्यात लोकसभेच्या अध्यक्षांना पत्र लिहून लखाड दौरा करून तेथे तैनात जवानांशी चर्चा करण्याची आणि त्यांच्या कामाच्या ठिकाणावरील परिस्थितीचा आढावा घेण्याची परवानगी मागितली होती.ही समिती कॅगच्या अहवालाचासुद्धा अभ्यास करत आहे. ज्या अहवालामध्ये जवानांना उबदार कपडे, उपकरणे आणि अन्य गरजेच्या वस्तू मिळत नसल्याचा उल्लेख आहे. या विषयाशी संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले की, पीएसीने ६ सप्टेंबर रोजी सीडीएस जनरल बीपीन रावत यांच्यासोबत जवानांना मिळणारे रेशन आणि कपड्यांबाबत चर्चा केली होती. या बैठकीदरम्यान पीएसीच्या अध्यक्षांनी लडाख दौरा करणार असल्याचे सांगितले होते. आता या दौऱ्याला अंतिम रूप देण्यासाठी पीएसी २३ सप्टेंबर रोजी ओम बिर्ला यांच्याशी पुन्हा एकदा चर्चा करणार आहेत.
संसदीय समिती लडाखचा दौरा करणार, फॉरवर्ड पोस्टवरील परिस्थितीचा आढावा घेणार
By बाळकृष्ण परब | Published: October 13, 2020 8:39 PM
India China FaceOff News : लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर मोठ्या प्रमाणात तैनात केलेले सैन्य, अशा तणावाच्या पार्श्वभूमीवर एक संसदीय समिती दोन दिवसांचा लडाख दौरा करणार आहे. २८ आणि २९ ऑक्टोबर रोजी हा दौरा होणार आहे
ठळक मुद्देकाँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांच्या अध्यक्षतेखालील पब्लिक अकाऊंट कमिटीचे सदस्य २८-२९ ऑक्टोबरला लेहचा दौरा करणार लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी संसदीय समितीच्या या दौऱ्यास मान्यता दिली या दौऱ्याला अंतिम रूप देण्यासाठी पीएसी २३ सप्टेंबर रोजी ओम बिर्ला यांच्याशी पुन्हा एकदा करणार चर्चा