नवी दिल्ली – चीनसोबत सुरु असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १९ जून रोजी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत भारताच्या सीमेत ना कोणी घुसखोरी केली आहे ना आपल्या पोस्टवर कब्जा केला आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले होते. त्यावरुन काँग्रेस खासदार राहुल गांधींनी चीनच्या आक्रमक पवित्र्यासमोर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताची जमीन सरेंडर केली, काँग्रेसकडून यावर विविध प्रश्न उपस्थित करण्यात आले. त्यावरुन आता पंतप्रधान कार्यालयाने स्पष्टीकरण दिले आहे.
सर्वपक्षीय बैठकीतील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विधानावरुन वाद होत असल्याने सरकारने याबाबत निवेदन काढत स्पष्टीकरण दिले आहे. सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्याचा विपर्यास केला असल्याचा दावा केला. पंतप्रधानांनी स्पष्टपणे हे सांगितले होते की, लाइन ऑफ एक्चुअल कंट्रोल बदलण्यासाठी कोणत्याही प्रयत्नाला भारत सडेतोड उत्तर देईल. अशा कोणत्याही आव्हानांचा भारतीय सेना ठोस उत्तर देण्यास सक्षम आहे असं सांगितले आहे.
पंतप्रधान कार्यालयाने सांगितले की, यावेळी चीनचे सैनिक मोठ्या संख्येने एलएसीवर आले आहेत ही माहिती सर्वपक्षीय बैठकीत दिली. १५ जून रोजी गलवान येथे हिंसाचार झाला. कारण चीनी सैनिक एलएसीच्या जवळ हालचाली करत होते, त्याला रोखण्यासाठी गेलेल्या सैनिकांवर हल्ला झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १५ जून रोजी गलवान येथे झालेल्या घटनेवर भाष्य केले आहे. ज्यात देशाचे २० सैनिक शहीद झालेत.
तसेच अशावेळी जेव्हा आपले शूर सैनिक देशाच्या सीमेचं रक्षण करत आहेत. त्यावेळी त्यांचे मनोबल खच्चीकरण करण्यासाठी अनावश्यक विवाद करणे हे दुर्दैवी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्यावर वाद वाढवण्यामागे प्रोपेगेंडा असून त्यामुळे भारताच्या एकजुटेला धक्का पोहचवू शकत नाही असा टोलाही निवेदनातून देण्यात आला आहे.
काय म्हणाले राहुल गांधी?
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चीनच्या आक्रमकतेपुढे झुकत स्वत:ला सरेंडर केले आहे. पंतप्रधानांचे म्हणणे असे असेल तर सोमवारी भारतीय जवान चीनच्या हद्दीत घुसलेले असा अर्थ निघतो. ज्या जागेवर भारतीय जवान शहीद झालेत, ती जागा चीनची होती का? आपल्या सैनिकांना का मारण्यात आले? असे प्रश्न उपस्थित केले होते.
मोदींनी भारताची जमीन चीनला देऊन टाकली; राहुल गांधी यांचा आरोप