लडाख – भारत आणि चीन यांच्यात गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षावरुन देशात काँग्रेस आणि भाजपा आमनेसामने आले आहेत. गलवान खोऱ्यातील संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले, यावरुन काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला जबाबदार धरले आहे, २० जवानांच्या मृत्यूला जबाबदार कोण? या सैनिकांना नि:शस्त्र का पाठवलं? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत.
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या आरोपाला आता भाजपाचे लडाखमधील खासदार जामयांग नामग्याल यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. काँग्रेस शहीदांच्या बलिदानाचं सेलिब्रेशन करत आहे. राहुल गांधींसह काँग्रेस नेते देश तोडण्याची भाषा करतात. त्यामुळे राहुल गांधींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हायला हवा अशी मागणी त्यांनी केली. देशाचे २० जवान शहीद झाले, १३० कोटी जनतेच्या डोळ्यात पाणी आहे. संपूर्ण देश या घटनेचा निषेध करत आहे पण काँग्रेस सेलिब्रेशन करत आहे. काँग्रेसमध्ये काहीतरी चाललं आहे असा आरोप त्यांनी केला.
तसेच राहुल गांधी खिल्ली उडवतात, प्रत्येक गोष्टीचे पुरावे मागतात, त्यांचे कार्यकर्तेही कमी नाहीत, देशाच्या जवानांच्या बलिदानाचं सेलिब्रेशन करतात, त्यांच्यासोबत जे बोलतात त्याचे कोणासोबत लिंक आहेत? गलवान चीनला घेऊ द्या असं काँग्रेस म्हणतं. कारगिलला पाकिस्तान घेऊन जाऊ द्या. ते काय षडयंत्र करत आहेत का? त्यांच्या पक्षाता काय सुरु आहे? काँग्रेसमधील कोणीतरी पाकिस्तान आणि चीनच्या संपर्कात आहे असा गंभीर आरोप लडाखचे खासदार जामयांग नामग्याल यांनी केला.
दरम्यान, देश तोडण्याचं षडयंत्र काँग्रेस करत आहे. राहुल गांधीविरोधात देशद्रोहाचा खटला दाखल करुन त्यांना अटक का केली जात नाही. चीनने भलेही भारतापासून तिबेट हडपलं. पण भारताची एक एक इंच जमीन त्यांना परत करावी लागेल. तसेच अक्साई चीन माझ्या मतदारसंघाचा भाग आहे लवकरच मी या भागाचा दौरा करणार आहे असंही भाजपा खासदार जामयांना नामग्याल यांनी सांगितले.
काय म्हणाले राहुल गांधी?
आता हे सिद्ध झाले आहे, की चीनने गलवानमध्ये जो हल्ला केला तो आधीपासूनच नियोजित होता. भारत सरकार यावेळी झोप घेत होते आणि समस्यांकडे दुर्लक्ष करत होते. या शिवाय राहुल गांधींनी लिहिले आहे, सरकारच्या हलगर्जीपणाचा परिणाम आपल्या जवानांना भोगावा लागला आहे.