सुरेश डुग्गर
जम्मू : पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनशी झालेल्या संघर्षामुळे निर्माण झालेला तणाव नजीकच्या काळात निवळण्याची शक्यता नाही. त्यामुळे भारतीय लष्कराने तिथे युद्धसज्जतेच्या दिशेने तयारी चालविली असून तीन डिव्हिजन तैनात केल्या आहेत. दुसरीकडे चीननेलडाख सीमेवर २० हजार जवान, तर तिबेट भागात १० हजार अतिरिक्त सैनिक आणून ठेवले आहेत.
या भागात भारत व चीनने रणगाडे, तोफा तसेच हवाई संरक्षणासाठी क्षेपणास्त्रेही सज्ज ठेवली आहेत. दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये सध्या तरी चकमकी होण्याची शक्यता नाही असे लष्करी अधिकाऱ्यांचे मत आहे. मात्र भारतीय लष्कराने सीमा सुरक्षेसाठी व थंडीपासून बचाव अशा दोन उद्दिष्टांसाठी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर खंदक खोदण्याचे काम सुरू केले आहे.
एका अधिकाºयाने सांगितले की, चीनचे सैन्य लडाखमधील वादग्रस्त भागातून सप्टेंबरपर्यंत मागे न हटल्यास सियाचीन व कारगिल याठिकाणी असलेल्या युद्धस्थितीचा अनुभव वापरून भारतीय लष्कराला हालचाली कराव्या लागतील. सियाचीनमध्ये लढण्याचा व तेथील मोर्चावर तैनात असण्याचा भारतीय जवानांना अनुभव आहे. कारगिलमध्ये पाकिस्तानी सैन्याने घुसखोरी केल्यानंतर भारतीय लष्कराने चढाई करून त्यांचा पराभव केला होता. कारगिलमध्ये अनेकदा तापमान शून्य अंश सेल्सियस खाली जाते. सियाचीनप्रमाणेच कारगिलमध्येही उणे ५० अंश सेल्सियसपर्यंत तापमान खाली उतरते.
पूर्व लडाखच्या सीमेवर भारतीय लष्कराच्या अधिक तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. तेथील स्थिती लक्षात घेता संरक्षण खर्चात वाढ होणार आहे. त्यामुळे संरक्षण मंत्रालय केंद्र सरकारच्या सतत संपर्कात आहे. या सैनिकांना थंडीपासून बचाव करता यावा यासाठीचे कपडे, स्नोबूट, संरक्षणविषयक उपकरणे यांची खरेदी भारतीय लष्कराने आता सुरू केली आहे.चीन माघारीस तयार, पण...पूर्व लडाखच्या सीमेवर चीनचे लष्कर काही किमी मागे हटण्यास तयार आहे. मात्र भारतीय सैन्यानेही काही किमी मागे हटावे, अशी अट चीनने घातली असल्याचे सूत्रांनी सांगितले. या दोन देशांच्या कोअर कमांडरांमध्ये मंगळवारी तिसºया टप्प्यातील चर्चा बारा तास चालली. भारतीय लष्कराने दुर्बुक, शयोक, दौलतबेग, ओल्डी रोड या भागांत गस्त घालू नये, अशी चीनने केलेली मागणी भारताने मान्य केली नाही.चीनने पूर्व लडाखच्या सीमेवरील सहा भागांत सैन्य आणून ठेवले असून, ते मागे हटायला तयार नाही.