India China FaceOff: राहुल गांधींच्या ‘त्या’ वक्तव्याचा शरद पवारांकडून समाचार; आंतरराष्ट्रीय कराराची दिली शिकवणी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2020 07:40 PM2020-06-19T19:40:43+5:302020-06-19T19:42:18+5:30
भारत आणि चीन यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली आहे
नवी दिल्ली – गलवान खोऱ्यात झालेल्या चीन आणि भारतीय सैनिकांमधील झटापटीत देशाचे २० जवान शहीद झाले. चीनच्या या कुरापतीमुळे देशात चीनविरोधात संतापाची लाट आहे. भारताने जवानांच्या बलिदानाचा बदला घ्यावा अशी मागणी देशातील नागरिक करत आहे. अनेक ठिकाणी लोकांनी चीनच्या राष्ट्रपतींचे पुतळे जाळून निषेध केला तर चीनच्या वस्तूंबाबत बॉयकॉट चीन हा ट्रेंडही सुरु करण्यात आला आहे.
भारत आणि चीन यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत सोनिया गांधी, शरद पवार, अखिलेश यादव, ममता बॅनर्जी यांच्यासह अनेक नेते उपस्थित आहेत. एकीकडे चीनने भारताचे बंधक बनवलेले १० सैनिकांची सुटका केली आहे. तर दुसरीकडे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने भारताच्या कोणत्याही सैनिकाला बंदी बनवलं नाही असं सांगितले आहे.
भारत आणि चीन यांच्यातील मेजर जनरल स्तरीय बैठक पुन्हा सुरु झाली आहे. ही बैठक चीनने भारताच्या १० सैनिकांची सुटका केल्यानंतर सुरु केली आहे. भारताच्या दबावामुळे चीनने हे सैनिक सोडल्याचं सांगण्यात येत आहे. पंतप्रधानांच्या सर्वपक्षीय बैठकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, सैनिकांनी हत्यार वापरलं की नाही याचा निर्णय आंतरराष्ट्रीय कराराशी होता आणि अशा संवेदनशील प्रकरणाचा सन्मान करण्याची गरज आहे.
All-party meeting with PM over India-China border issues: NCP Chief and Former Defence Minister Sharad Pawar said that issues of whether soldiers carried arms or not are decided by international agreements and we need to respect such sensitive matters (Source) pic.twitter.com/qdQIzu3C5z
— ANI (@ANI) June 19, 2020
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर आरोप करत सैनिकांना नि:शस्त्र का पाठवण्यात आलं असा आरोप केला होता. त्यावर शरद पवारांनी सर्वपक्षीय बैठकीत भाष्य केले आहे. देशाचे संरक्षण मंत्री राहिलेले शरद पवारांनी सांगितले की, सैनिक कधी, केव्हा हत्यार सोबत ठेवणार आणि कुठे नाही हे आंतरराष्ट्रीय करारानुसार निश्चित झालं आहे. अशा संवेदनशील मुद्द्यावर बोलताना आपल्या सावधता बाळगली पाहिजे असं त्यांनी सांगितले. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत शरद पवारांनी हे वक्तव्य केले.
काय म्हणाले राहुल गांधी?
आता हे सिद्ध झाले आहे, की चीनने गलवानमध्ये जो हल्ला केला तो आधीपासूनच नोयोजित होता. भारत सरकार यावेळी झोप घेत होते आणि समस्यांकडे दुर्लक्ष करत होते. चीनने भारताच्या निशस्र सैनिकांची हत्या करून एक मोठा अपराध केला आहे. माझा प्रश्न आहे की, या वीरांना निशस्त्र धोक्याच्या दिशेने कुणी आणि का पाठवले, याला कोण जबाबदार आहे? असा सवाल राहुल गांधी यांनी विचारला होता.
जवानांना धोक्याच्या दिशेने निशस्त्र कुणी आणि का पाठवले, राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल