नवी दिल्ली : लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत-चीन सीमेवर झालेल्या दोन्ही सैन्यांच्या हिंसक चकमकीत भारताचे तीन जवान शहीद झाले. यावर पंजाबचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी ट्विटरच्या माध्यमातून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सतत असे कृत्य करणाऱ्या चीनविरोधात भारत सरकारने कडक पावले उचलण्याची आता वेळ आली आहे, असे कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी म्हटले आहे.
कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, "गलवान खोऱ्यात चिनी सैन्याकडून अशाप्रकारे वारंवार उल्लंघन होत आहे. आता या घुसखोरीला उत्तर देण्याची वेळ आली आहे. आमचे जवान कोणत्याही खेळाचा भाग नाहीत. दर काही दिवसांनी सीमेच्या रक्षणासाठी आपले काही अधिकारी व जवान शहीद होत आहेत."
"भारत सरकारने यावर काही कठोर पावले उचलण्याची आता वेळ आली आहे. आपल्या एक-एक कमजोरीच्या निशाण्यावर चीन अधिकाधिक युद्धप्रिय असल्याचे दाखवतो. मी संपूर्ण देशासह आमच्या शूर शहीद जवानांना श्रद्धांजली वाहतो. आपल्या या दु: खाच्या घटनेत देश आपल्याबरोबर आहे.", असे दुसरे ट्विट कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केले आहे.
दरम्यान, सोमवारी रात्री लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत-चीन सीमेवर झालेल्या दोन्ही सैन्यांच्या झटापटीमध्ये एका अधिकाऱ्यासह तीन भारतीय जवान शहीद झाले होते. मात्र, चीनच्या सैन्याला भारतीय जवानांनी चोख प्रत्यूत्तर दिले असून चीनचेही पाच जवान ठार झाले आहेत. दोन्ही देशांमध्ये जवळपास पाच दशकांनंतर एवढी गंभीर घटना घडली असून लष्करप्रमुख एम. एम. नरवणे यांनी पठाणकोट लष्करी तळाला भेट देण्याचा दौरा रद्द केला आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सकाळीच परराष्ट्र मंत्री जयशंकर आणि लष्करप्रमुख एम.एम. नरवणे यांची बैठक बोलावली होती.
एकीकडे भारत-चीन सीमेवरील तणाव निवळण्यासाठी दोन्ही देशांचे लष्करी अधिकारी प्रयत्न करत आहेत. यातच आता दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये चकमक झाल्यामुळे तणाव आणखीच वाढल्याचे दिसून येते. यावर चीनने भारतावर गंभीर आरोप केले असून भारतीय जवानांनी दोनदा चीनची हद्द ओलांडल्याचा दावा केला आहे. तसेच, भारतीय जवानांनी आधी चीनच्या सैनिकांना आक्रमणासाठी चिथावणी दिल्याचे म्हटले आहे.
आणखी बातम्या...
CoronaVirus News : कोरोना संकटापुढे 'गुजरात मॉडेल' फेल - राहुल गांधी
तामिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, 13.35 लाख लोकांना मिळणार आर्थिक मदत
मानसिक रुग्णांना विमा का मिळत नाही?, सुप्रीम कोर्टाचा केंद्र सरकारला सवाल
पाण्यापेक्षा कच्चे तेल स्वस्त! मग पेट्रोल 10 दिवसांत 5 रुपयांपेक्षा महाग का झाले?
दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन हॉस्पिटलमध्ये दाखल, कोरोना टेस्ट होणार