Indian Nuclear Submarine: भारत सरकारच्या CCS ने, म्हणजेच पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील सुरक्षाविषयक कॅबिनेट समितीने दोन स्वदेशी आण्विक पाणबुड्या तयार करण्यास परवानगी दिली आहे. यामुळे भारतीय नौदलाची सामरिक आणि आक्रमक क्षमता वाढेल. या पाणबुड्यांच्या बांधणीमुळे हिंदी महासागर आणि दक्षिण चीन समुद्रात भारतीय नौदलाची ताकद वाढणार आहे. या पाणबुड्यांची बांधणी विशाखापट्टणम येथील शिप बिल्डिंग सेंटरमध्ये केली जाईल. यासाठी लार्सन आणि टुब्रो सारख्या खाजगी कंपन्यांची मदत घेतली जाईल असे सांगण्यात आले आहे. पाणबुड्यांच्या बांधणीतील ९५ टक्क्यांपर्यंतची सामग्री ही स्वदेशी असेल. या पाणबुड्या अरिहंत क्लास पेक्षा वेगळ्या असतील. अडव्हान्स टेक्नॉलॉजी व्हेसल प्रणालीच्या माध्यमातून या पाणबुड्या बनवल्या जाणार आहेत.
आता दोन, नंतर आणखी चार पाणबुड्या
सध्या दोन पाणबुड्यांची बांधणी केली जाईल. त्यानंतर आणखी चार पाणबुड्यांची बांधणी केली जाण्याची शक्यता आहे. भारताने अलीकडेच त्यांची दुसरी SSBN म्हणजेच आण्विक पाणबुडी INS अरिघाट कार्यान्वित केली आहे. पुढील वर्षभरात विविध प्रकारच्या युद्धनौका आणि पाणबुड्या भारतीय नौदलात उपलब्ध होणार आहेत.
कोणत्या युद्धनौका सहभागी होणार?
नौदलात सामील होणाऱ्या १२ युद्धनौकांमध्ये फ्रिगेट्स, कॉर्वेट्स, विनाशक, पाणबुड्या आणि सर्व्हे व्हेसल याचा समावेश आहे. नौदलात त्यांचा समावेश केल्याने, हिंद महासागर क्षेत्रातील (IOR) सुरक्षा पातळी सुधारण्यास मदत होईल असे जाणकारांचे म्हणणे आहे.