लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली: ‘भारताच्या मूळ भावनेवर सातत्याने आक्रमण केले जात आहे आणि सध्याच्या सरकारच्या काळात द्वेषाची दरी खोदली जात आहे,’ असा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बुधवारी केला.
पक्षाच्या १३८ व्या स्थापनादिनी ध्वजारोहण केल्यानंतर त्यांनी महागाई, बेरोजगारी आणि द्वेषाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन जावे लागेल, असेही सांगितले. लोकशाही आणि देशाची राज्यघटना कमकुवत करणाऱ्या भाजप आणि आरएसएसविरोधात काँग्रेसचा लढा सुरूच राहील, असे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सांगितले.
काँग्रेसने प्रासंगिकता गमावली नाही : स्टॅलिन
मित्रपक्ष काँग्रेसने राष्ट्रीय स्तरावर प्रासंगिकता किंवा महत्त्व गमावले आहे, असे वाटत नाही, असे मत तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रमुकचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांनी व्यक्त केले आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा सामना करण्यासाठी काँग्रेससह राष्ट्रीय आघाडी स्थापन्यावरही त्यांनी जोर दिला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"