Corona Vaccine Booster Dose: जगातील अनेक देशांमध्ये कोरोनावर मात करण्यासाठी आता बुस्टर डोसवर विश्वास दाखवला जात आहे. अमेरिकेत तर नागरिकांना कोरोना विरोधी लसीचा बुस्टर डोस देण्यास सुरुवात देखील करण्यात आली आहे. पण भारतात बुस्टर डोसबाबत अद्याप मतमतांतरं सुरू आहेत. आतापर्यंत जागतिक आरोग्य संघटनेनंही (WHO) बुस्टर डोसबाबत कोणतंही मोठं पाऊल उचललेलं नाही. यातच भारतातही याबाबत अजून जास्त चर्चा सुरू झालेली नाही. पण आता ट्रेंड बदलताना दिसत आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाची (National Technical Advisory Group) या महिन्याच्या अखेरीस कोरोना विरोधी लसीचा बुस्टर डोस देण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली तर या बैठकीत बुस्टर डोसबाबत महत्त्वाची चर्चा केली जाऊ शकते. बुस्टर डोससोबतच लहान मुलांना लस देण्याच्या मुद्द्यावरही चर्चा केली जाऊ शकते. दरम्यान, या दोन्ही मुद्द्यांवर आतापर्यंत विविध चर्चा केल्या जात असल्या तरी ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे या बैठकीला महत्व प्राप्त झालं आहे. एका उच्चस्तरिय बैठकीत बुस्टर डोस दिली जाणाऱ्याबाबत चर्चा करण्याची ही पहिलीच वेळ ठरणार आहे.
बुस्टर डोसबाबत चर्चा झाल्यानंतर पुढील दोन आठवड्यांमध्ये रणनीती केंद्रीय पथकाद्वारे तयार केली जाणार असल्याचीही माहिती समोर आली आहे. त्याच रणनीतीचा वापर लहान मुलांच्या लसीकरणावेळी केला जाईल असं सांगण्यात येत आहे. जानेवारी महिन्यात लहान मुलांना लस दिली जाण्याची शक्यता आहे. पण याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. भारतात सध्या लहान मुलांसाठीच्या झायडस कॅडिला लसीबाबत चर्चा सुरू आहे. लहान मुलांसाठीच्या कोरोना लसीबाबत कोणत्याही पद्धतीची घाई केली जाणार नाही, असं केंद्र सरकारनं याआधीच स्पष्ट केलं आहे. संपूर्ण संशोधनानंतरच निर्णय घेण्यात येईल, असं सांगण्यात आलं आहे.