नवी दिल्लीकोरोनाविरुद्धच्या लढ्यात भारताला लवकरच आणखी एक खुशखबर मिळण्याची शक्यता आहे. भारत बायोटेक कंपनी देशात लवकरच कोरोनाच्या 'नेझल स्प्रे'ची चाचणी करणार आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्रातील नागपूरमध्ये या 'नेझल स्प्रे'ची पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील चाचणी केली जाणार आहे.
भारत बायोटेकच्या डॉ. कृष्णा इल्ला यांच्या माहितीनुसार त्यांच्या कंपनीने वॉशिंग्टन विद्यापीठासोबत करार केला आहे. कोरोनाच्या लशीचे दोन डोस घ्यावे लागणार आहेत. पण नाकावाटे दिली जाणारी ही 'नेझल वॅक्सीन' फक्त एकदाच घ्यावी लागेल. त्यामुळे लशीपेक्षा हा उत्तम पर्याय असल्याचं सांगितलं जात आहे.
डॉ. चंद्रशेखर यांच्या माहितीनुसार पुढील दोन आठवड्यांमध्ये Nasal Covaxin च्या चाचणीला सुरुवात होईल. नाकावाटे दिल्या जाणारी लस ही इंजेक्शन द्वारे दिल्या जाणाऱ्या लशीपेक्षा अधिक चांगली असल्याचे पुरावे असल्याचंही ते म्हणाले आहेत. भारत बायोटेककडून लवकर यासंबंधीच्या चाचणीचा प्रस्ताव 'डीजीसीआय'समोर ठेवण्यात येणार आहे.
भुवनेश्वर, नागपूर, पुणे आणि हैदराबादमध्ये या लशीच्या चाचणीला सुरुवात होणार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यासाठी १८ ते ६५ वर्षांपर्यंतच्या ४० ते ४५ स्वयंसेवकांची निवड केली जाणार आहे.
नेमकी कशी असते "नेझल लस"?जगात आतापर्यंत बाजारात आलेल्या कोरोनावरील लशी या इंजेक्शनच्या माध्यमातून दिल्या जात आहेत. पण नेझल लस ही नाकाच्या वाटे देण्यात येईल. कारण कोरोना व्हायरस सर्वाधिकपणे नाकावाटेच पसरण्याचा धोका आहे. त्यामुळे नेझल स्प्रेच्या माध्यमातून दिली जाणार लस अधिक परिणामकारक ठरू शकते असा अंदाज आहे.
वॉशिंग्टन स्कूल ऑफ मेडिसीनच्या संशोधनानुसार नाकावाटे लस दिली गेल्यास शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती चांगल्या पद्धतीने विकसीत होते. नाकात कोणत्याही पद्धतीचा संसर्गजन्य विषाणू येण्यास यातून रोखता येऊ शकतं.
इंजेक्शनपेक्षा अधिक प्रभावशाली ठरेल का?'नेझल स्प्रे'सारख्या लशीला जर मान्यता मिळाली तर कोरोनाविरुद्धच्या लढ्यात हे पाऊल मोठा कायापालट करणारे ठरू शकते, असं तज्ज्ञांचं मत आहे. कारण इंजेक्शनमुळे मानवाचे संपूर्ण शरीर सुरक्षित होतं असं ठामपणे सांगता येऊ शकत नाही. पण नाकावाटे स्प्रेच्या माध्यमातून लस दिली गेल्यास ती चेहऱ्यासह संपूर्ण शरीराला सुरक्षित ठेवण्यासासाठी उपयोगी ठरू शकते, असं तज्ज्ञांना वाटतं.