नवी दिल्ली, दि. 26 - संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेमध्ये भारतानं पाकिस्तानच्या खोटारडेपणाला जशास तसे उत्तर दिले आहे. 'राइट टू रिप्लाय'अंतर्गत उत्तर देताना भारतीय राजदूत अधिकारी पॉलोमी त्रिपाठी यांनी शहीद लेफ्टनंट उमर फय्याज यांचे फोटो दाखवले, ज्यांची मे 2017मध्ये जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानातील दहशतवाद्यांनी निर्घृण हत्या केली होती.
संयुक्त राष्ट्रसंघातील पाकिस्तानच्या प्रतिनिधींनी पॅलेस्टिनी महिलेचा फोटो काश्मीरमधील पीडित म्हणून दाखवला होता, त्यावर भारताच्या प्रतिनिधींनी हे चोख प्रत्युत्तर देत पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड केला आहे. भारतीय राजदूत पॉलोमी त्रिपाठी यांनी शहीद लेफ्टनंट उमर फय्याज यांचा फोटो संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत दाखवत पाकिस्तानचा खोटारडेपणा सर्वांसमोर आणला आहे.
फय्याज यांचा फोटो सादर करताना भारतानं सांगितले की, पाकिस्ताननं एक खोटी कहाणी रचण्यासाठी बनावट फोटोचा वापर केला आणि जागतिक दहशतवादातील पाकिस्तानच्या भूमिकेहून जगाचं लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न पाकिस्तान करत आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या सभेत बोलताना पाकिस्तानच्या प्रतिनिधी मलीहा लोधी यांनी एका महिलेचा फोटो दाखवला होता. लोधी यांनी दाखवलेल्या फोटोतील महिलेच्या चेहऱ्यावर बंदुकीच्या छऱ्यांनी झालेल्या जखमांच्या खुणा होत्या. 'काश्मीरमधील लोकांवर सुरु असलेल्या अत्याचारांचा हा पुरावा आहे,' असे लोधींनी म्हटले होते. मात्र हा फोटो काश्मीरमधील नसून तो एका पॅलेस्टिनी महिलेचा असल्याचे भारतीय प्रतिनिधींनी स्पष्ट केले. यावरुन पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा एकदा जगासमोर आला आहे.
'पाकिस्तान दहशतवादाचे आंतरराष्ट्रीय केंद्र झाला आहे आणि यापासून जगाचे लक्ष विचलित करण्यासाठी पाकिस्तानचे प्रयत्न सुरु आहेत,' अशा शब्दांमध्ये त्रिपाठींनी पाकिस्तानला सुनावले आहे. भारताची प्रतिमा डागाळण्यासाठी पाकिस्तानकडून चुकीचा फोटो संयुक्त राष्ट्रसंघात दाखवण्यात आला, असा आरोपही यावेळी त्यांनी केला. पाकिस्तानचा हा खोटारडेपणा सर्वांसमोर आणण्यासाठी त्रिपाठी यांनी काश्मीरमध्ये शहीद झालेल्या लेफ्टनंट उमर फय्याझ यांचा फोटो सभेत दाखवला. पाकिस्तानच्या प्रतिनिधींनी दाखवलेला खोटा फोटो आणि उमर फय्याज यांचा खरा फोटो त्रिपाठींनी सभागृहाला दाखवला. फय्याज यांचा फोटो दाखवताना त्रिपाठी असंही म्हणाल्या. 'पाकिस्तानच्या प्रतिनिधी हे सत्य लपवण्याचा प्रयत्न करत होत्या', अशा शब्दांमध्ये त्रिपाठींनी पाकिस्तानला सणसणीत चपराक लगावली आहे.