नवी दिल्ली - भारत सरकारने देशामध्ये धार्मिक अल्पसंख्याकांवरील हल्ल्यांवरून अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टविरोधात भारताने परखड प्रतिक्रिया दिली आहे. आंतरराष्ट्रीय संबंधांमध्येही व्होट बँकेचे राजकारण सुरू आहे, ही बाब दुर्भाग्यपूर्ण आहे, असे भारताने म्हटले आहे. अमेरिकेने आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य-२०२१ रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. त्यात भारतात धार्मिक अल्पसंख्याकांवर वर्षभर हल्ले होत असतात, असे नमूद करण्यात आले आहे.
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टमध्ये सांगितले आहे की, आम्ही अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटने प्रसिद्ध केलेला आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वतंत्रता रिपोर्ट पाहिला आहे, तसेच अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या चुकीच्या माहितीचाही विचार केला आहे. आंतरराष्ट्रीय संबंधांमध्येही व्होटबँकेचे राजकारण केले जात आहे, ही बाब दुर्दैवी आहे. विशिष्ट हेतूने प्रेरित आणि पक्षपाती भूमिकेच्या आधारावर विश्लेषण करणे टाळले पाहिजे, असं आम्ही आवाहन करतो.
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, भारताची ओळख स्वाभाविकपणे बहुलवादी समाज म्हणून आहे. येथे धार्मिक स्वातंत्र आणि मानवाधिकारांना महत्त्व दिलं जातं. अमेरिकेसोबतच्या चर्चेमध्ये आम्ही तेथील वांशिक आणि धार्मिक हेतूने प्रेरित हल्ले, द्वेषातून होणारे हल्ले आणि गन कल्चरसह अनेक मुद्दे नियमितपणे उपस्थित केले आहे.
आयआरएफचा २०२१ चा रिपोर्ट अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी प्रसिद्ध केला आहे. या रिपोर्टमध्ये अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने जगभरातील धार्मिक स्वातंत्र्याची स्थिती आणि उल्लंघनाबाबत आपले विचार मांडले आहेत. या रिपोर्टमध्ये भारतामधील धार्मिक अल्पसंख्याकांच्याविरोधात होत असलेला हिंसाचारावर मत मांडण्यात आले आहे. त्यामध्ये अल्पसंख्याकांच्या हत्या, त्यांना घाबरवणे आणि धमकावणे यांचा समावेश आहे. तसेच गोहत्या आणि गोमांसाच्या व्यापाराच्या आरोपाच्या आधारावर बिगर हिंदूंविरोधात गोरक्षकांकडून केल्या गेलेल्या घटनांचाही उल्लेख आहे.
यापूर्वीही भारताने अमेरिकेकडून प्रसिद्ध केलेला आंतरराष्ट्रीय धार्मिक रिपोर्ट फेटाळून लावला होता. आपल्या नागरिकांच्या घटनात्मक अधिकारांशी संबंधित मुद्द्यावर कुठल्याही विदेशी सरकारला प्रतिक्रिया देण्याचा कुठलाही अधिकार नसल्याचे ठणकावून सांगितले होते.