नवी दिल्ली : ‘फरझान बी’ हे प्रचंड आकाराचे सागरी गॅस क्षेत्र विकसित करण्याचे कंत्राट भारतीय कंपन्यांच्या समूहास देण्यासाठी इराणवर दबाव आणण्याचा एक भाग म्हणून भारत इराणकडून केल्या जाणाऱ्या खनिज तेलाच्या आयातीमध्ये येत्या वर्षात २० टक्क्यांनी कपात करणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.इराणला त्यांच्या सागरी हद्दीत असलेले ‘फरझान बी’ हे गॅस क्षेत्र विकसित करायचे असून, मध्यंतरी त्यासाठी इच्छुकांकडून निविदा मागविण्यात आल्या होत्या. या क्षेत्रात १२.५ खर्व घनफूट एवढा प्रचंड भूगर्भ वायूचा साठा असल्याचा आणि तो ३० वर्षे पुरेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. ‘ओएनजीसी विदेश’च्या नेतृत्वाखाली काही भारतीय सरकारी तेल कंपन्यांच्या समूहाने यासाठी तीन अब्ज डॉलरची बोली दिली आहे. मात्र बराच काळ झाला तरी इराणने या कंत्राटाविषयी अद्याप निर्णय घेतलेला नाही.सूत्रांनुसार इराणने या कंत्राटाचा भारताला लाभदायी असा निर्णय लवकर घ्यावा यासाठी भारताने इराणकडून केल्या जाणाऱ्या तेल आयातीत कपात करण्याचे ठरविले आहे. तशा सूचना पेट्रोलियम मंत्रालयाने सरकारी तेल कंपन्यांना याआधीच दिल्या आहेत व त्यानुसार या कंपन्यांनी या कपातीची पूर्वकल्पना इराणच्या राष्ट्रीय तेल कंपनीस दिली असल्याचे समजते. मात्र तेल आयात करणाऱ्या भारतीय कंपन्या किंवा इराणची सरकारी तेल कंपनी यांनी याविषयी कोणतेही अधिकृत भाष्य केलेले नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)
इराणी तेलात भारताने केली कपात
By admin | Published: April 02, 2017 12:59 AM