नवी दिल्ली : गलवान खोऱ्यात सध्या शांततापूर्ण बोलणी सुरू असली तरी चिनी ड्रॅगनवर भारताला विश्वास नाही. महिनाअखेर संरक्षण ताफ्यात दाखल होणारी राफेल विमाने त्यामुळेच चीन सीमेवर तैनात करण्यावर भारतीय हवाई दलात सध्या चर्चा सुरू आहे. गेल्या महिनाभरापेक्षाही जास्त काळापासून भारत-चीनमध्ये हिंसक झटापटीनंतर बोलणी सुरू आहे. दोन्ही देश तणाव कमी करणे, सीमेवरून सैन्य मागे हटविण्याच्या बाजूने असले तरी भारताने सीमेवर आपल्या हद्दीत गस्त वाढवली आहे.
दिल्ली व बीजिंगमध्ये राजनैतिक चर्चा, सीमेवर लष्करी अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू असताना भारताने मात्र सीमा सुरक्षेची तयारी सुरू केली आहे. एकीकडे आम्ही चर्चेला तयार आहोत, असे दाखवून युद्धसज्जताही सुरू असल्याचा संदेश त्यामुळे जाईल. विशेष म्हणजे दोन्ही देशांकडून अद्याप कोणतीही तीव्र प्रतिक्रिया येत नसली तरी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या सूचक विधानामुळे चीन अस्वस्थ आहे. (चीनशी) चर्चा सुरू असली तरी त्यातून तोडगा निघेलच असे नाही; पण भारताच्या एक इंच जमिनीचा तुकड्यावरही कुणी कब्जा करू शकत नाही, असे राजनाथ सिंह यांनी ठणकावले होते.
भारताने रशिया, जर्मनीकडून तातडीने शस्त्रात्रे खरेदी करणार असल्याचे वृत्त २८ जून रोजी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले होते. फ्रान्सकडूनही भारताने अत्यंत घातक शस्त्रास्त्रे खरेदी केली आहेत. त्यातील राफेल जेटची सीमेवर संख्या वाढविण्यावर संरक्षण मंत्रालयात चर्चा सुरू आहे. तसे केल्यास चीनची काय प्रतिक्रिया येईल, याचीही चाचपणी परराष्ट्र व्यवहार मंत्रालय करीत आहे. येत्या २२ जुलै रोजी हवाई दलप्रमुख आरकेएस भदोरिया यांच्या नेतृत्वात कमांडर स्तरावरील सातही अधिकाºयांमध्ये २ दिवस चर्चा होणार आहे. पाकिस्तान व चीन सीमेवर हवाई संरक्षण सज्जता वाढविण्यावर त्यात भर असेल.
भारत-चीनमध्ये लष्करी स्तरावरील चर्चा सुरूच
भारत चीनमध्ये लष्करी स्तरावरील चर्चा याही आठवड्यात सुरू राहील. दोन्ही देशांचे प्रतिनिधी त्यात सहभागी होतील. सीमेवर चर्चा सुरू असताना दोन्ही देशांनी राजनैतिक संबंध पूर्ववत करण्यासाठी एक-एक पाऊल पुढे टाकले आहे. चिनी दूतावास, चिनी परराष्ट्र मंत्रालयाने भारत-चीनसंबंधांचा अभ्यास असणारे प्राध्यापक, पत्रकार, अभ्यासकांसाठी वेबिनार आयोजित केला, तर बीजिंगमध्ये भारतीय दूतावासानेही दोन्ही देशांचा अभ्यास असणाºयांना राजदूतांसमवेत चर्चेसाठी निमंत्रित केले होते.
विशेष म्हणजे दोन्ही देशांमधील या व्हर्च्यूअल संवादाचा भर व्यापारवृद्धीवरच होता. राफेल जेटची सीमेवर संख्या वाढविण्यावर चर्चा सुरू आहे. तसे केल्यास चीनची काय प्रतिक्रिया येईल, याचीही चाचपणी मंत्रालय करीत आहे.