नवी दिल्ली : भारत आणि चीन यांच्यात लडाखमध्ये काही महिन्यांपासून सुरू असलेल्या वादामुळे संभाव्य धोक्यापासून संरक्षण करण्यासाठी भारतीय सैन्याने पूर्ण तयारी केली आहे. सैन्याने लडाखच्या एलएसीवर सैनिकांची मोठ्या संख्येने तैनाती केली आहे. याचवेळी ५०० किमीपर्यंतची माऱ्याची क्षमता असणारे ब्रह्मोस क्षेपणास्त्र, जमिनीवरून हवेत मारा करू शकणारे आकाश क्षेपणास्त्र आणि ८०० किमी माºयाची क्षमता असणारे निर्भय क्षेपणास्त्रही सज्ज ठेवले आहे.
सूत्रांनी सांगितले की, कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी भारताने ही तयारी केली आहे. ब्रह्मोस हे क्षेपणास्त्र हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर मारा करू शकते. या माध्यमातून तिबेट आणि शिनजियांगपर्यंत लक्ष ठेवले जाऊ शकते. निर्भय क्षेपणास्त्राचीही तैनाती करण्यात आलेली आहे. ८०० किमीपर्यंतची क्षमता असणारे हे क्षेपणास्त्र जमिनीवरून जमिनीवर मारा करू शकते. भारतीय सैन्याने तैनात केलेले तिसरे क्षेपणास्त्र आहे आकाश. एलएसीवर कोणत्याही विमानाची घुसखोरी रोखण्याची यात क्षमता आहे.