नवी दिल्ली - अरबी समुद्रात पाकिस्तानच्या नौदलाकडून युद्ध सराव सुरु आहे. मात्र पाकिस्तानच्या युद्ध सरावावर भारताने करडी नजर ठेवली आहे. पुढील काही पाकिस्तानी नौदल अरबी समुद्रात रॉकेट आणि मिसाइल फायरिंग करत युद्ध सराव करणार आहे. पाकिस्तानच्या युद्धासरावामुळे भारताने सतर्क राहण्याची भूमिका घेतली आहे. भारताने काही युद्धनौका, पाणबुडी, पेट्रोलिंग करणारी विमाने यांच्यासह काही लढाऊ विमानंही याठिकाणी तैनात केली आहेत.
जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 हटविल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव वाढलेला आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशातील नेते एकमेकांविरोधात युद्धाची भाषा बोलू लागलेत. तसेच अण्वस्त्र हल्ल्याचीही धमकी दोन्ही देशांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे पाकिस्तान करत असलेल्या या युद्ध सरावाने भारत सतर्क झाला आहे.
सुरक्षा यंत्रणांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी पाकिस्ताच्या युद्ध सरावावर भारताने लक्ष ठेवलं होतं. जर युद्धसरावाच्या आडून पाकिस्तानने नापाक हरकत केली तर भारतीय नौदल आणि जवान सशस्त्र तैनात ठेवण्यात आले आहेत. कलम 370 हटविल्यानंतर पाकिस्तानकडून आणि त्यांच्या दहशतवाद्यांकडून हल्ल्याची शक्यता नाकारता येत नाही. पाकिस्तानचा युद्धसराव नेहमीप्रमाणे होत असला तरी अचानक त्यांचे उदिष्ट बदलू शकते असा दावा केला जात आहे.
29 सप्टेंबरपर्यंत चालणार पाकिस्तानचा युद्धसरावपाकिस्तानने अरबी समुद्राच्या उत्तरेकडे जाणाऱ्या मालवाहू जहाजांना मेरिटाइम अलर्ट जारी केला आहे. 25 सप्टेंबर ते 29 सप्टेंबरपर्यंत लाइव्ह मिसाइल, रॉकेट, बंदूक याचा वापर केला जाणार आहे. जर युद्ध सरावाच्या दरम्यान पाकिस्तानच्या हालचालींवर भारत नजर ठेवणार आहे. जर काही संशयास्पद आढळल्यास भारताने पाकिस्तानला चोख उत्तर देण्याची तयारी ठेवली आहे. भारतीय नौदल आणि हवाई दल पाकिस्तानला जशास तसे उत्तर देण्यासाठी सज्ज आहेत.
भारतीय हवाई दलाने पुलवामा हल्ल्यानंतर एअरस्ट्राइक करत पाकिस्तानच्या बालकोट भागात जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर पुन्हा एकदा बालकोट भागात दहशतवादी तळ सक्रीय झाल्याची माहिती लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती.