Hardeep Singh Puri : भारताने रशियाकडून इंधन विकत घेऊन जगावर उपकार केले असल्याचे केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी म्हटलं आहे. भारताने रशियाकडून इंधन विकत घेतले नसते तर त्याची किंमत अधिक वेगाने वाढली असती. असे करून भारताने जगावर उपकार केल्याचे केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी म्हणाले. केंद्रीय मंत्री पुरी यांनी त्यांच्या सोशल मिडिया अकाऊंटवर एक पोस्ट लिहीत ही माहिती दिली आहे. पुरी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये ते मुलाखत देताना दिसत आहेत.
युक्रेनवर लष्करी कारवाई केल्यामुळे रशियाला अनेक देशांच्या निर्बंधांना सामोरे जावे लागले होते. त्यावेळी भारताने रशियाकडून इंधन खरेदीचा निर्णय घेतला होता. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या म्हणण्यानुसार, युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियाकडून इंधन खरेदी करण्याच्या भारताच्या निर्णयामुळे जागतिक तेलाच्या किमतीत होणारी संभाव्य वाढ रोखण्यात मदत झाली आहे. अबुधाबीमध्ये दिलेल्या मुलाखतीत केंद्रीय मंत्री पुरी यांनी म्हटलं की जर भारत सरकारने रशियाकडून इंधन विकत घेतले नसते तर जागतिकस्तरावर इंधनाची किंमत सर्वांसाठी २०० डॉलरपर्यंत वाढली असती.
रशियातील इंधनावर कोणतेही निर्बंध नसल्याचे केंद्रीय मंत्री पुरी यांनी म्हटले आहे.'रशियन इंधन खरेदी करून भारताने संपूर्ण जगावर उपकार केले आहेत, कारण आम्ही तसे केले नसते तर जागतिक किंमत प्रति बॅरल २०० डॉलरने वाढली असती. रशियन तेलावर कधीही बंदी नव्हती, फक्त किंमतीची मर्यादा होती. भारतीय कंपन्यांनी याचे पालन केले आहे, असं पुरी म्हणाले.
अपूर्ण माहिती असलेल्यांनी हे विसरू नये की त्यांनी भारतावर निर्बंध लादण्याची चर्चा केली होती. अनेक युरोपियन, आशियाई देशांनी अब्जावधी डॉलर्सचे कच्चे तेल, डिझेल, एलएनजी आणि दुर्मिळ खनिजे खरेदी केली आहेत. आमच्या तेल कंपन्यांना जो सर्वोत्तम दर देईल त्यांच्याकडून आम्ही ऊर्जा खरेदी करत राहू, असेही हरदीप सिंग पुरी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा हा विश्वास आहे. दररोज पेट्रोल पंपांना भेट देणाऱ्या आमच्या सात कोटी नागरिकांची उपलब्धता आणि सातत्य आम्हाला सुनिश्चित करण्याची गरज आहे. हे आमचे सर्वात मोठे प्राधान्य असल्याचे पुरींनी म्हटलं.
भारत हा एकमेव सर्वात मोठा ग्राहक आहे, जेथे इतर देशांमध्ये अभूतपूर्व जागतिक किमतीत वाढ झाल्यानंतर ३ वर्षांत तेलाच्या किमती झपाट्याने घसरल्या आहेत.' विशेष बाब म्हणजे भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा तेल ग्राहक आहे, जो आपल्या गरजेच्या ८० टक्के गरजांसाठी परदेशातून खरेदीवर अवलंबून आहे, असेही पुरी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.