नवी दिल्ली - पाकिस्तानच्या ताब्यात असलेले विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या सुटकेसाठी कुठल्याही प्रकारच्या वाटाघाटी करण्याचा भारताने नकार दिला आहे. अभिनंदन यांची तात्काळ सुटका करण्यात यावी अशी मागणी भारताने केल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयामधील सुत्रांनी दिली आहे. तसेच अभिनंदन यांना काही झाल्याच भारत कठोर पावले उचलेल असा इशाराही देण्यात आला आहे.बुधवारी भारतीय हद्दीत घुसून हल्ला करणाऱ्या पाकिस्तानी विमानांना भारतीय हवाई दलाने चोख प्रत्युत्तर दिले होते. त्यावेळी पळ काढणाऱ्या विमानाचा पाठलाग करताना भारताचे मिग-२१ लढाऊ विमान बुधवारी (ता. २७) कोसळले. त्यावेळी विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे पाकिस्तानच्या तावडीत सापडले होते. दरम्यान, अभिनंदन यांच्या सुटकेसाठी भारताकडून आक्रमक पावले उचलण्यात आली असून, त्यासंदर्भात पाकिस्तानशीही संपर्क साधण्यात आला होता. विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या सुटकेसाठी पाकिस्तान चर्चेस तयास असल्याचे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मोहम्मद कुरेशी यांनी म्हटले होते. मात्र त्याला प्रत्युत्तर देताना परराष्ट्र मंत्रालयाने अभिनंदन यांच्या सुटकेसाठी कुठल्याही तडजोडी करण्यात येणार नाही, असे स्पष्ट केले आहे. ''पाकिस्तानने विंग कमांडर अभिनंदन यांची तात्काळ सुटका करावी. या प्रकरणात कुठल्याही वाटाघाटी करण्याचा प्रश्नच उदभवत नाही. जर पाकिस्तान याबाबत काही तडजोडी करण्याचा प्रयत्न करत असेल, तर ती त्यांची चूक आहे. तसेच विंग कमांडर अभिनंदन यांच्याशी मानवतावादी दृष्टीकोनातून व्यवहार व्हावा, असे भारताने म्हटले आहे.
यावेळी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानी लढाऊ विमानांनी केलेल्या हल्ल्याचाही तीव्र शब्दात निषेध केला. ''दहशतवाद्यांविरोधात कारवाई करताना भारताने लोकवस्ती आणि पाकिस्तानी लष्करी तळांना लक्ष्य केले नाही. मात्र पाकिस्तानने भारताच्या लष्करी तळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप भारताने केला. तसेच पाकिस्तानने दहशतवाद्यांविरोधात विश्वसनीय कारवाई करावी, अशी मागणीही भारताने केली आहे.
भारताने मुंबई आणि पठाणकोट हल्ल्यानंतरही पाकिस्तानला पुरावे पाठवले होते. आता पुलवामा हल्ल्याला 13 दिवस उलटल्यानंतरही पाकिस्तान या हल्ल्यामागील जैश ए मोहम्मदची भूमिका नाकारत आहे.