S Jaishankar, USA-Pakistan Ties: भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी अमेरिकेने पाकिस्तानला दिलेल्या आर्थिक मदतीबाबत चिंता व्यक्त केली आहे. अमेरिकेने पाकिस्तानशी आर्थिक हितसंबंध ठेवल्याने कोणत्याही देशाला फायदा झालेला नाही, असे त्यांना सांगितले. अमेरिकेच्या वतीने एफ-16 लढाऊ विमानांच्या देखभालीसाठी पाकिस्तानला ४५० दशलक्ष डॉलर्सची आर्थिक मदत देण्यात आल्याबद्दल जयशंकर बोलत होते. परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितले की, पाकिस्तानला दिलेली अशी मदत कोणाच्या विरोधात वापरली जाते हे सर्वांना माहिती आहे. 'तुम्ही आम्हाला मूर्ख समजता का? तुम्ही कोणालाही फसवू शकत नाही', अशा शब्दांत त्यांनी अमेरिकेलाही सुनावले.
अमेरिकतील भारतीयांशी एका कार्यक्रमात संवाद साधताना जयशंकर यांनी हा प्रश्न विचारण्यात आला होता. त्या प्रश्नाचे उत्तर देताना जयशंकर यांनी अनेक मुद्दे मांडले. “खरं सांगायचं तर (अमेरिका-पाकिस्तान) या नात्याचा ना पाकिस्तानला फायदा झाला आहे ना अमेरिकेच्या हितासाठी याची मदत झाली आहे. त्यामुळे आता या नात्याचा फायदा काय, याचा विचार अमेरिकेनेच करायला हवा. कारण त्यातून त्यांना काय मिळत आहे, हे त्यांनी बघावे. दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी एफ-16 विमानांच्या देखभालीसाठी पॅकेज मंजूर करण्यात आले आहे, असा युक्तिवाद अमेरिकेने केला होता. पण एफ-16 कुठे आणि कोणाविरुद्ध वापरले जाते हे सर्वांना माहिती आहे. आम्हाला तुम्ही मूर्ख समजता का? तुम्ही अशा गोष्टी बोलून कोणालाही फसवू शकत नाही", अशा शब्दांत त्यांनी अमेरिकेले सुनावले आणि थेट सवाल केला.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या प्रशासनाने ८ सप्टेंबर रोजी पाकिस्तानला एफ-16 लढाऊ विमानांसाठी ४५० दशलक्ष डॉलर्सची मदत मंजूर केली. डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील माजी प्रशासनाने पाकिस्तानला लष्करी मदत रोखण्याचा निर्णय घेतला होता. तो निर्णय बायडन सरकारने मागे घेतला. अमेरिकेच्या संसदेला दिलेल्या अधिसूचनेत, परराष्ट्र विभागाने म्हटले आहे की, एफ-16 लढाऊ विमानांच्या देखभालीसाठी पाकिस्तानला संभाव्य विदेशी लष्करी विक्री (FMS) मंजूर करण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्रालयाने असा युक्तिवाद केला होता की यामुळे पाकिस्तानला वर्तमान आणि भविष्यात दहशतवादी कारवायांना सामोरे जाण्याची क्षमता राखण्यास याची मदत होईल. त्यावरून एस जयशंकर यांनी अमेरिकेचा समाचार घेतला.