ऑनलाइन लोकमत
मोहाली, दि. 23 - फिरोजशाह कोटलावर झालेल्या पराभवाचा वचपा महेंद्रसिंग धोनी अॅन्ड कंपनीने आज रविवारी मोहालीमध्ये काढला. भारताने तिसऱ्या वन डेत 7 गडी आणि 10 चेंडू राखत विजय मिळवत पाच सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. 6 धावांवर असताना रॉस टेलरने विराट कोहलीचा सोडलेला झेल किवींना चांगलाच महागात पडला. विराटने पुन्हा एकदा लक्ष्याचा पाठलाग करताना मॅचविनीग खेळी केली आणि एकदिवसीय क्रिकेटमधील 26वं शतक साजरं केलं. त्याच्या शानदार नाबाद 154 धावांच्या जोरावर भारताने किवींनी दिलेल्या 286 धावांचा पाठलाग करत विजय साजरा केला. या खेळीमध्ये विराटने किवींच्या सर्वच गोलंदाजांचा समाचार घेतला. एमएस धोनी आणि विराट कोहलीने तिस-या विकेटसाठी 151 धावांची महत्वपूर्ण भागिदारी केली. धोनी(80) धावांवर असताना मॅट हेन्रीने त्याला टेलरकडे झेल देण्यास भाग पाडले. त्यानंतर मैदानात आलेल्या मनिष पांडेने (28) विराटला चांगली साथ दिली.
त्यापुर्वी न्यूझीलंडनं 49.4 षटकांत सर्व बाद 285 धावांची मजल मारली.भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारल्यावर मार्टिन गुप्टिल आणि टॉम लॅथम यांनी न्यूझीलंडला आक्रमक सुरुवात करून दिली. मात्र उमेश यादवने गुप्तिलला (27) आणि केदार जाधवने केन विल्यम्सनला (22) बाद करत न्यूझीलंडच्या आक्रमकतेला ब्रेक लावला. त्यानंतर लॅथम आणि टेलरने 73 धावांची भागीदारी करत पाहुण्यांना दीडशेपार पोहोचवले. आठ बाद 199 अशी अवस्था झाली असताना जेम्स नीशाम आणि मॅट हेन्रीनं नवव्या विकेटसाठी 84 धावांची भागीदारी रचून न्यूझीलंडच्या डावाला आकार दिला. भारतीय संघाकडून केदार जाधव आणि उमेश यादव यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या, तर बुमराह आणि मिश्रा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स मिळवल्या.