-चंद्रकांत दडस
नवी दिल्ली : यंदा जगभरातील तब्बल ७० देशांमध्ये निवडणुका असताना खोट्या माहितीचा (फेक न्यूज) धोका नागरिकांना निर्माण झाला आहे. चुकीच्या आणि दिशाभूल करणाऱ्या माहितीचा जगात सर्वाधिक धोका भारताला आहे. भारतात वाढते आजार, गैरव्यवहार, संपत्तीची असमानता, कामगार टंचाईचा धोका असताना आता चुकीच्या माहितीचाही (फेक न्यूज) देशाला मोठा फटका बसतो आहे. एप्रिल ते मेदरम्यान लोकसभा निवडणुकांत १.४ अब्ज लोकसंख्या निवडणुकीला सामोरी जाण्यास तयार असताना वाढलेल्या फेक न्यूजमुळे चिंता निर्माण झाली आहे. फेक न्यूजमुळे देशात मोठी अस्थिरता पसरू शकते, असा इशाराही अहवालात देण्यात आला आहे.
धोका कुठे? फेक न्यूजचा सर्वाधिक धोका भारतासह, अल साल्वाडोर, सौदी अरेबिया, पाकिस्तान, रोमानिया, आयर्लंड, अमेरिका, सिएरा लिओन, फ्रान्स आणि फिनलंड या देशांना आहे.
२०१९च्या निवडणुकीमध्येही...भारतात २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्येही फेक न्यूज मोठ्या प्रमाणात पसरविण्यात आल्या होत्या. व्हॉट्सॲप, फेसबुकचा वापर करून पक्षांनी समर्थकांना भडकावणारे संदेश प्रसारित केले होते. यामुळे हिंसा भडकण्याची भीती निर्माण झाली होती. कोराेनाकाळातही व्हॉट्सॲपद्वारे चुकीची माहिती देण्यात येत होती.
अहवाल कुणाचा? जागतिक आर्थिक मंचने सादर केलेल्या ग्लोबल रिस्क अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.
फेक न्यूजमुळे काय होईल?फेक न्यूजमुळे लोकांमध्ये चुकीची माहिती पसरवून नवनिर्वाचित सरकारांना अस्थिर करण्याचा प्रयत्न करण्यात येईल.राजकीय अशांतता, हिंसाचार आणि दहशतवाद आणि लोकशाही डळमळीत करण्याचा प्रयत्न फेक न्यूजच्या माध्यमातून करण्यात येईल. जगभरातील १,४९० तज्ज्ञांच्या मतांचा आधार घेत हा अहवाल तयार करण्यात आला आहे.