चीननं (China) पुन्हा एकदा अरुणाचल प्रदेशमधूनभारतीय हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. परंतु भारतीय सैनिकांनी (Indian Army) चीनचा हा प्रयत्न हाणून पाजला. तसंच या कारवाईदरम्यान, भारतीय सैनिकांनी काही चिनी सैनिकांना ताब्यात घेतलं होतं. चिनी सैनिकांनी (Chinese Soldiers) अरूणाचल प्रदेश येथील तवांगमध्ये घुसखोरी करत सीमेवर तयार करण्यात आलेल्या रिकाम्या बंकर्सना लक्ष करण्याचा प्रयत्न केला. तब्बल २०० सैनिकांनी भारतीय हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न केला. परंतु त्यांचे प्रयत्न भारतीय लष्करानं हाणून पाडले.
समोर आलेल्या माहितीनुसार ही घटना गेल्या आठवड्यात नियंत्रण रेषेच्या जवळ (LAC) बुम ला आमि यांग्त्से या दरम्यान घडली होती. न्यूज १८ नं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नियंत्रण रेषेवर चिनी सैनिकांनी भारतीय हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न केला. याला भारतीय लष्करानंही कठोर प्रत्युत्तर देत काही चिनी सैनिकांना तात्पुरतं ताब्यातही घेतलं होतं.
सरकारी सूत्रांनी न्यूज १८ ला दिलेल्या माहितीनुसार चिनी सैनिकांना ताब्यात घेतल्यानंतर स्थानिक सैन्य कमांडर स्तरावरील एक बैठक पार पडली आणि त्यानंतर चिनी सैनिकांना पुन्हा सोडण्यात आलं. या घटनेवर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. भारतीय लष्कराला या दरम्यान, कोणतंही नुकसान पोहोचलं नसल्याचंही यावेळी सांगण्यात आलं. यापूर्वीही सीमेवर शांतता राहावी यासाठी अनेकदा करार करण्यात आले.