इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या ८ महिन्यांपासून गाझापट्टीमध्ये जबरदस्त युद्ध सुरू आहे. या प्रदीर्घ युद्ध काळात इस्रायलच्या अनेक जुन्या मित्रांनी त्याच्याकडे पाठ फिरवली, मात्र भारत या कठीण काळातही त्याचा एक खरा मित्र बणून उभा आहे. गाझामध्ये युद्ध सुरू झाल्यापासूनच भारताने इस्रायलला तोफगोळे, वजनाने हलकी शस्त्रे आणि ड्रोनचा पुरवठा केला आहे. अरबी मीडिया आउटलेट शफाक न्यूजने इस्त्रायली वृत्तपत्र येदिओथ अहनोथ (Yedioth Ahronoth) मधील वृत्ताच्या हवाल्याने म्हटले आहे की, भारत इस्रायलला हैदराबादमध्ये तयार झालेले 'हर्मीस 900' ड्रोनचा पुरवठा करत असल्याची माहिती फेब्रुवारी महिन्यात पहिल्यांद समोर आली.
भारतीय लष्कराला इस्रायली ड्रोनच्या पुरवठ्यासाठी, इस्रायलच्या सहकार्याने हैदराबादमध्ये एक कारखाना सुरू करण्यात आला आहे. हा कारखाना, इस्रायली संरक्षण कंपनी एल्बिट सिस्टिम्स आणि भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील कंपनीसोबत एक संयुक्त उपक्रम म्हणून काम करतो. याच फॅक्ट्रीमधून गाझामध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान इस्रायली सैन्यासाठी 20 ड्रोन पाठवण्यात आले. संबंधित वृत्तानुसार, हमाससोबत संघर्ष सुरू झाल्यपासून भारताकडून दारूगोळा आणि इतर शस्त्रास्त्रांचा होणारा पुरवठा, दोन्ही दोशांतील वाढती धोरणात्मक भागीदारी दर्शवतो. जी इस्रायलसाठी अत्यंत फायद्याची ठरली आहे.
कारगिल युद्धात इस्रायलनं केली होती मदत - भारतातील इस्रायलचे माजी राजदूत डॅनियल कार्मन यांनी भारताच्या या सहकार्यामागील एका ऐतिहासिक घटनेचाही उल्लेख केला. जेव्हा इस्रायलने 1999 मध्ये पाकिस्तानसोबत झालेल्या कारगिल युद्धादरम्यान भारताला महत्वपूर्ण लष्करी मदत केली होती.
अमेरिकेनेही हात मागे घेतले - इस्रायलचा सर्वात चांगला मित्र असलेल्या अमेरिकेनेही अलिकडच्या काळात शस्त्रास्त्र पुरवठा करण्यावर बंदी घातली आहे. असे असतानाच, भारत इस्रायलसोबत उभे राहणे महत्वाचे ठरते. महत्वाचे म्हणजे, अमेरिकन प्रशासन आपल्याला युद्धादरम्यान शस्त्रास्त्रे पुरवण्यावर बंदी घालत आहे, असा आरोप इजरायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी याच आठवड्यात केला आहे.