'INDIA'ची स्थापना केली, पण ताळमेळ जुळेना, डावे म्हणाले आम्ही ममतां बॅनर्जींविरोधात लढणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2023 03:35 PM2023-07-19T15:35:06+5:302023-07-19T15:36:26+5:30
Loksabha Election 2024: इंडिया या आघाडीच्या माध्यमातून तब्बल २६ विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. मात्र परस्परविरोधी पक्षांचा समावेश असल्याने पहिल्या दिवसापासूनच या आघाडीमध्ये सूर जुळत नसल्याचे दिसत आहे.
पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला पराभूत करण्यासाठी विरोधी पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तसेच भाजपाविरोधात एकत्रितपणे लढण्यासाठी इंडिया नावाने आघाडीची स्थापना केली आहे. या आघाडीच्या माध्यमातून तब्बल २६ विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. मात्र परस्परविरोधी पक्षांचा समावेश असल्याने पहिल्या दिवसापासूनच या आघाडीमध्ये सूर जुळत नसल्याचे दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार डाव्या पक्षांनी आपण पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींविरोधात लढणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.
विरोधी पक्षांची बैठक बोलावण्यामध्ये आणि आघाडीला नवं नाव देण्यामध्ये काँग्रेस, नितीश कुमार आणि ममता बॅनर्जी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. काल विरोधी पक्षांच्या बैठकीनंतर राहुल गांधी यांनी सांगितले की, ही लढाई एनडीए आणि इंडिया यांच्यातील आहे. ही लढाई नरेंद्र मोदी आणि इंडिया यांच्यातील आहे. ही लढाई भाजपाची विचारसरणी आणि इंडिया यांच्यातील आहे. ही लढाई देशासाठी आहे. त्यामुळे आम्ही इंडिया हे नाव निवडलं आहे. तर ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या की, एनडीए किंवा भाजपा भारतला आव्हान देऊ शकतात? आम्हाला इंडियाला वाचवायचं आहे. देशाला वाचवायचं आहे. भारत जिंकणार, इंडिया जिंकणार, देश जिंकणार, भाजपा हरणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता.
याबाबत सीपीआय (एम)चे नेते सीताराम येचुरी यांनी तृणमूल काँग्रेससोबत कुठलीही आघाडी करण्यास नकार दिला. त्यांनी सांगितले की, डावे पक्ष काँग्रेससह भाजपा आणि तृणमूल काँग्रेस या दोघांविरोधात लढतील. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेससोबत कुठलीही आघाडी केली जाणार नाही. इंडियाकडून पंतप्रधानपदासाठी सध्यातरी कुठलाही चेहरा निवडला जाणार नाही. आघाडीतील सदस्य इंडियामधील घटकपक्षांमध्ये असलेली प्रतिस्पर्धा कमी करण्याचा प्रयत्न करतील. तसेच आघाडी ही विशिष्ट्य राज्यासाठी असेल.
दरम्यान, गेल्या आठवड्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी बंगालमध्ये पुढील लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि डावे पक्ष मिळून तृणमूल काँग्रेसविरोधात लढतील, अशी घोषणा केली होती.