- संजय शर्मानवी दिल्ली - तंत्रज्ञान आणि आर्थिकशक्तीच्या जोरावर मध्य आशिया आणि युरोपमधील देशांवर वर्चस्व गाजवण्याच्या चीनच्या रणनीती आणि इच्छेला तडा गेला आहे. भारत, मध्य आशिया, युरोप आणि अमेरिका दरम्यान बांधण्यात येत असलेल्या रेल्वे, जलवाहतूक दळणवळण मार्गामुळे (कॉरिडॉर) चीनला जोरदार झटका दिला आहे.
'बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह च्या माध्यमातून चीनला मध्य-पूर्व आशियातील पेट्रोलियम उत्पादक देशांवर आपले वर्चस्व प्रस्थापित करायचे होते. चीनचे हे स्वप्न जी-२० परिषदेतील या एका कराराने भंग केले. हा प्रकल्प आधी चीन बांधणार होता, तो आता भारतीय अभियंते आणि भारतीय रेल्वे बांधणार आहे, हे निश्चित झाल्यानंतर चीनला मोठा धक्का बसला आहे.
चीनला बीआरआयच्या माध्यमातून मध्य आशियातील छोटे देश आणि युरोपातील काही देशांना कर्जाच्या जाळ्यात अडकवायचे होते. परंतु भारत आखात युरोप कॉरिडॉरमुळे चीनच्या मनसुब्यावर पाणी फेरले. अमेरिकाही या प्रकल्पाचा आर्थिक खर्च उचलणार आहेत.
युरोपचे दरवाजे आता चीनला बंद?या प्रकल्पात भारत, अमेरिका, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, जॉर्डन, इस्रायल, तुर्की, जर्मनी, इटली आदी देश सहभागी होत आहेत. हे देश सामील झाले म्हणजे चीनला आता मध्यपूर्व आशिया आणि युरोपमध्ये स्थान नाही.
भारताला सुवर्णसंधीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सौदी अरेबियाचे राजकुमार मोहम्मद बिन सलमान यांच्या भेटीत या प्रकल्पातील भारताच्या महत्त्वाच्या भूमिकेवर चर्चा झाली. भारताबाहेर मध्यपूर्व आशिया आणि युरोपच्या देशांमध्ये आपले तंत्रज्ञान दाखविण्याची संधी मिळत असताना भारतीय रेल्वेसाठी ही एक मोठी सुवर्णसंधी आहे. भारताला आपले कौशल्य दाखविण्याची आणि परकीय गंगाजळी कमावण्याची ही मोठी संधी आहे. त्यामुळे भारताला दळणवळणाचा लाभही मिळेल.