लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : भारताने नागरिकांना कोरोना लसीचे ३२ कोटी ३६ लाख डोस दिले असून ही संख्या अमेरिकेपेक्षा जास्त आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये कोरोनाच्या नव्या रुग्णांची ४६ हजारांपर्यंत खाली घसरली असून ५८ हजार जण बरे झाले आहेत. हजारपेक्षा कमी जणांचा मृत्यू झाला असून गेल्या ७६ दिवसांतील हे सर्वात कमी प्रमाण आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांचा आकडा पावणेसहा लाखांच्या जवळपास आहे.
अमेरिकेमध्ये आतापर्यंत ३२ कोटी ३३ लाख कोरोना लसींचे डोस देण्यात आले आहेत. हा आकडा भारताने पार केला आहे. ब्रिटन, जर्मनी, इटली, फ्रान्स या देशांमध्ये अनुक्रमे ७ कोटी ६७ लाख, ७ कोटी १४ लाख, ४ कोटी ९६ हजार व ५ कोटी २४ लाख कोरोना लसी तेथील नागरिकांना देण्यात आल्या. देशात राज्यांकडे सध्या १.५ कोटी लसी शिल्लक आहेत, असे केंद्राने म्हटले आहे.
बरे होणारे ९६ टक्केगेल्या २४ तासांत कोरोनाचे ४६ हजार ४८ नवे रुग्ण सापडले असून ५८ हजार ५७८ जण बरे व ९७९ जण मरण पावले. या संसर्गाने मरण पावलेल्यांची संख्या ३ लाख ९६ हजार ७३० वर गेली असून बरे होणाऱ्यांचे प्रमाण ९६.८० टक्के आहे. तर उपचार घेत असलेल्या रुग्णांची आकडेवारी ५ लाख ७२ हजार ९९४ झाली आहे. एकूण रुग्णांच्या तुलनेत ते १.८९ टक्के आहेत.