भारताचा GDP 4 ट्रिलियन डॉलर्स पार; काँग्रेस म्हणते- 'भाजपने खोट्या बातम्या पेरल्या'
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2023 19:37 IST2023-11-20T19:36:35+5:302023-11-20T19:37:07+5:30
4 Trillion Dollar Economy: भारताचा जीडीपी 4 ट्रिलियन डॉलर्सच्या पुढे गेल्याचा दावा अनेक भाजप नेत्यांनी केला आहे.

भारताचा GDP 4 ट्रिलियन डॉलर्स पार; काँग्रेस म्हणते- 'भाजपने खोट्या बातम्या पेरल्या'
4 Trillion Dollar Economy: काल माध्यमांमध्ये एक बातमी व्हायरल झाली, ज्यात भारताच्या जीडीपीने $ 4 ट्रिलियनचा टप्पा ओलांडल्याचा दावा करण्यात येत आहे. पण, केंद्र सरकार आणि त्यांच्या मंत्र्यांचा दावा खोटा असल्याची टीका काँग्रेसने केली आहे. सोमवारी(20 नोव्हेंबर) सत्ताधारी भाजपवर ताशेरे ओढत काँग्रेसने आरोप केला की, फक्त खळबळ माजवण्यासाठी या खोट्या बातम्या पसरवण्यात आल्या.
Between 2:45pm and 6:45pm yesterday, when the nation was glued to watching the cricket match, various drumbeaters of the Modi Govt including senior Union ministers from Rajasthan and Telangana, the Deputy CM of Maharashtra, as well as the PM's most favoured businessman, tweeted…
— Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) November 20, 2023
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर एका पोस्टमध्ये काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, काल रविवारी (19 नोव्हेंबर) दुपारी 2.45 ते 6.45 दरम्यान संपूर्ण देश क्रिकेटच्या अंतिम सामन्याचा आनंद घेत होता. यावेळी, राजस्थान आणि तेलंगणातील वरिष्ठ केंद्रीय मंत्री, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवडते उद्योगपती यांच्यासह मोदी सरकारमधील अनेक बड्या नेत्यांनी एक ट्विट केले. त्यात भारताचा जीडीपी 4 ट्रिलियन डॉलर्सच्या पुढे गेल्याचे सांगण्यात आले' हे वृत्त पूर्णपणे खोटे आहे, हा फक्त खळबळ माजवण्याचा प्रयत्न आहे, अशी टीका त्यांनी केली.
नवा भारत प्रगती करतोय - देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दावा केला होता की, भारताच्या अर्थव्यवस्थेने 4 ट्रिलियन डॉलरचा टप्पा ओलांडला आहे. यावरून मोदी सरकारची गतिमानता आणि दूरदर्शी नेतृत्व दिसून येते. नवा भारत अतिशय सुंदरपणे प्रगती करत आहे, असे ते म्हणाले होते.
भारतासाठी अभिमानाचा क्षण – गजेंद्र सिंह शेखावत
केंद्रीय मंत्री शेखावत म्हणाले होते की, भारतासाठी हा अभिमानाचा क्षण आहे, कारण आपला जीडीपी 4 ट्रिलियन डॉलर्सच्या पुढे गेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नव्या भारताचा उदय खरोखरच अनोखा आहे.
5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेने वाटचाल - जी किशन रेड्डी
याला मोदींची हमी म्हणत कॅबिनेट मंत्री जी किशन रेड्डी यांनी लिहिले की, आम्ही 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत.
दोन वर्षांत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल - गौतम अदानी
X वर स्क्रीनशॉट शेअर करताना गौतम अदानी यांनी लिहिले, अभिनंदन भारत, फक्त दोन वर्षात आपण जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू. आम्ही जपानची 4.4 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था आणि जर्मनीची 4.3 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था मागे टाकू. तिरंगा फडकतच राहील, जय हिंद.