नवी दिल्ली: स्विस बँकेतील खातेधारकांच्या माहितीचा तिसऱ्या टप्प्यातील तपशील केंद्र सरकारला याच महिन्यात मिळेल. स्वित्झर्लंडसोबत झालेल्या आदान प्रदान कराराच्या अंतर्गत ही यादी भारताला मिळेल. विशेष म्हणजे स्वित्झर्लंडमध्ये मालमत्ता विकत घेतलेल्या भारतीयांचा तपशीलदेखील भारताला मिळणार आहे. अशा प्रकारची माहिती प्रथमच उपलब्ध होणार आहे.
परदेशांत असलेला काळा पैसा परत आणण्याचं आश्वासन नरेंद्र मोदींनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीआधी जनतेला दिलं होतं. मात्र ७ वर्षांत या आघाडीवर फारसं काम झालेलं नाही. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी सरकार आणि भाजपनं काळ्या पैशांचा मुद्दा फारसा वापरला नव्हता. मात्र आता केंद्र सरकारनं भारतीयांनी स्वित्झर्लंडमध्ये केलेल्या बेनामी गुंतवणुकीकडे लक्ष वळवलं आहे. याच महिन्यात केंद्राला स्वित्झर्लंडमध्ये भारतीयांनी विकत घेतलेले फ्लॅट, अपार्टमेंटसह इतर मालमत्तांची माहिती मिळेल.
भारतीयांच्या बँक खात्यांची माहिती तिसऱ्यांदा केंद्र सरकारला मिळणार आहे. २०१९ मध्ये पहिल्यादा आणि २०२० मध्ये दुसऱ्यांदा सरकारला स्विस बँकेतील भारतीय खातेधारकांची माहिती केंद्राला मिळाली. स्वित्झर्लंडमधील मालमत्तांची माहिती पहिल्यांदाच केंद्र सरकारला प्राप्त होईल. रिअल इस्टेटशी संबंधित तपशील देण्याची तयारी स्विस सरकारनं दर्शवली आहे. मात्र एनजीओ आणि अन्य फाऊंडेशनमधील योगदानाची माहिती देण्याची तयारी स्विस सरकारनं दाखवलेली नाही.