Russia vs Ukraine War: इकडे आड अन् तिकडे विहीर! युक्रेन-रशियाच्या युद्धानं भारत पेचात; अडचणीत मोदी सरकार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 06:38 PM2022-02-24T18:38:41+5:302022-02-24T18:41:19+5:30
Russia vs Ukraine War: युक्रेन-रशियाच्या युद्धामुळे भारतासमोर मोठा पेच; मोदी सरकारच्या भूमिकेकडे जगाचं लक्ष
Russia-Ukraine Crisis: रशियानं युक्रेनवर हल्ला करत युद्धाची घोषणा केली आहे. रशियाचे रणगाडे युक्रेनमध्ये शिरले आहेत. अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, जपान, ऑस्ट्रेलियासह जगातील अनेक देशांनी रशियाचा निषेध केला आहे. काही देशांनी निर्बंधदेखील लादले आहेत. मात्र रशिया माघार घेण्यास तयार नाही. आता संपूर्ण जगाचं लक्ष भारताकडे आहे. भारत सरकारनं याबद्दल अद्याप स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. भारतावर दबाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीत हालचालींना वेग आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे.
२०१४ मध्ये रशियानं क्रिमिया ताब्यात घेतला. तेव्हा भारतानं रशियाच्या बाजूनं भूमिका घेतली होती. क्रिमिया ताब्यात घेतल्यानंतर रशियावर लादण्यात आलेल्या निर्बंधांचा भारतानं निषेध केला होता. जगाची तमा न बाळगता भारत आपल्या जुन्या मित्रासोबत उभा राहिला. मात्र तेव्हा परिस्थिती वेगळी होती. आता भारत अमेरिका आणि युरोपियन देशांच्या जवळ गेला आहे. चीनच्या आक्रमक पवित्र्यानं भारतासमोर आव्हानं उभं केलं आहे. पाकिस्तान रशियासोबत मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान सध्या मॉस्कोमध्येच आहेत.
भारताचा समावेश जगातील आघाडीच्या अर्थव्यवस्थांमध्ये होतो. २०१४ मध्ये युक्रेन-रशियात संघर्ष झाला. पुतीन यांनी क्रिमिया रशियाला जोडला. त्यावेळी भारतानं रशियाचं समर्थन केलं होतं. त्यावेळीही अमेरिका, युरोपियन युनियन आणि अन्य अनेक देश रशियाचा निषेध करत होते. रशियाला जी८ गटातून बाहेर काढण्यात आलं. निर्बंध लादण्यात आले. मात्र पुतीन जराही मागे हटले नाहीत.
मोठा आंतरराष्ट्रीय दबाव असताना व्लादिमीर पुतीन यांनी २०१४ मध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याशी फोनवरून संपर्क साधला होता. क्रिमियामधील परिस्थिती पुतीन यांनी सिंग यांना सांगितली. दुसऱ्याच दिवशी भारतानं भूमिका जाहीर केली. आम्ही आमचा विश्वासू साथीदार असलेल्या रशियासोबत उभे आहोत. त्यांच्यावर घालण्यात आलेल्या निर्बंधांचा आम्ही निषेध करतो, अशी ठाम भूमिका सिंग सरकारनं घेतली. त्यानंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. पण या विषयावरील भारताची भूमिका बदलली नाही.
आता भारत काय करणार?
२०१४ ते २०२२ या ८ वर्षांत परिस्थिती बरीच बदलली आहे. अमेरिका आणि युरोपियन देशांसोबतचे भारताचे संबंध अधिक घनिष्ठ झाले आहेत. रशियासोबतचे संबंध आणखी दृढ झाले आहेत. या कालावधीत चीन बराच आक्रमक झाला आहे. तर रशिया आणि चीनचे संबंध गेल्या काही महिन्यांत सुधारले आहेत. भारतानं पाश्चिमात्य देशांसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यास रशिया आणि चीन या देशांशी एकाचवेळी शत्रुत्व निर्माण होईल.
दुसरीकडे पाकिस्तान रशियासोबतचे संबंध सुधारण्याच्या प्रयत्नात आहे. संपूर्ण जग पुतीन यांच्यावर टीका करत असताना इम्रान खान मॉस्कोत आहेत. भारत आणि रशियाचे संबंध जुने आहेत. मात्र अमेरिका आणि युरोपियन देशांसोबतचे संबंधदेखील भारताला खराब करायचे नाहीत. त्यामुळे या प्रकरणात भूमिका घेणं भारतासाठी इकडे आड आणि तिकडे विहीर अशी परिस्थिती आहे.