नवी दिल्ली: भारताच्या इतिहासात आर्थिक सुधारणांच्या दृष्टिकोनातून 1991 हे वर्ष अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. यापूर्वी भारताची अर्थव्यवस्था खुली नव्हती. रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डॉ. सी. रंगराजन यांच्या पुस्तकातून 1991 आणि त्यानंतरच्या संदर्भात अनेक मोठ्या गोष्टी उघड झाल्या आहेत. त्यांच्या The Road: My Days At RBI and Beyond या पुस्तकात त्यांनी त्या काळातील परिस्थितीबद्दल सांगितले आहे.
मनीकंट्रोलच्या रिपोर्टनुसार, माजी गव्हर्नर डॉ. सी. रंगराजन यांनी लिहिले की, आम्हाला (भारताला) पैसे उभारण्यासाठी विविध मार्गांचा विचार करावा लागला. मग परदेशात सोने गहाण ठेवून पैसे उभे करायचे ठरवले. तेव्हा आम्ही 46 टन सोने परदेशात गहाण ठेवले होते. मुंबई विमानतळावरुन चार्टर विमानाने सोने इंग्लंडला गेले, त्याबदल्यात सूमारे $500 मिलियन मिळाले. आज ही रक्कम खूपच कमी वाटू शकते. पण, त्या काळात ही रक्कम खूप मोठी होती. विमानातून सोने परदेशात पाठवणे, हा दु:खद अनुभव होता.
पुस्तक लिहिण्याची कल्पना कशी सुचली?रंगराजन सांगतात की, पुस्तक लिहिण्याची इच्छा खूप दिवसांपासून होती. 2014 मध्ये केंद्रात सरकार बदलल्यानंतर मी दिल्ली सोडली. मग मला वाटले की हीच योग्य वेळ आहे. तेव्हा माझ्या मनात काही शंका आल्या. रिझर्व्ह बँकेतील माझ्या कार्यकाळातील सर्व घटनांबद्दल लिहिणे शक्य नव्हते. मग, मी काही गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याचा विचार केला.
आजची महागाई, भूतकाळातील निर्णयांमुळेसी. रंगराजन म्हणतात की, राजकोषीय धोरण आणि चलनविषयक कठोरपणा यांच्यातील संघर्षाचे व्यवस्थापन करण्यासाठी अनेक उपाययोजना कराव्या लागतील. काही प्रमाणात असे म्हणता येईल की, आज आपण जी महागाई पाहत आहोत, ती आपण आधी घेतलेल्या काही निर्णयांमुळे आहे. कोरोनाची लाट शिगेला असताना सर्वांनी सरकारला खर्च वाढवण्याचा सल्ला दिला होता. सरकारचा महसूल कमी होत असताना, हा निर्णय घ्यावा लागला. याचा परिणाम काय झाला? आणखी कर्ज घ्यावे लागले.
रुपयावर काय म्हणाले?माजी गव्हर्नर म्हणतात की, भारतीय रुपयाबद्दल बोलायचे झाले तर, फंड्स देशातून अमेरिकेत जात आहेत. कारण तिथे इंटरेस्ट रेट जास्त आहेत. यामुळे रुपयाची व्हॅल्यू घसरत आहे. पण, आता हळुहळू रुपया सावरत आहा. याचे कारण म्हणजे, फंड्स बाहेर जाणे थांबले किंवा कमी झाले आहे. आता बाहेरुन फंड्स येणे सुरू झाले आहे. भारताच्या मॉनेटरी पॉलिसीने त्यावरही लक्ष देणे सुरू करायला हवे.