- दत्तात्रय शेकटकर
पाकिस्तानच्या कुरापती लक्षात घेतल्या तर भारताला सर्जिकल स्ट्राईक शिवाय कोणताही पर्याय नव्हता. पाकिस्तानच्या सैन्याला व दहशतवाद्यांना धडा शिकवायला होता. पाकिस्तानच्या कँपवर आपल्या गुप्तचर यंत्रणा गेल्या सात दिवसांपासून लक्ष ठेवून होत्या. त्यांच्याकडे असलेल्या माहितीनुसार हे दहशतवादी भारतीय सीमेजवळ आले होते व त्यांचा भारतीय सीमेमध्ये घुसण्याचा प्रयत्न होता. ही माहिती आपल्याकडे असल्याने त्यांच्यावर तातडीने हल्ला करण्याची गरज होती. त्यामुळे ताबडतोब जाऊन हल्ला करा असे आदेश देण्यात आले त्यानुसार ही सर्जिकल स्ट्राईक करण्यात आली. अशा परिस्थितीत सैन्याने २४/७ दक्ष राहणे गरजेचे असते. त्यानुसार भारतीय सैन्याने ही कारवाई केली. १९७१ नंतर मनोहर पर्रिकर यांच्या नेतृत्वाखाली सैन्यदलाने हे धाडस दाखवले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्त्वाचा धाडसी निर्णय घेतला. भारतीय सैन्यदलाचेही अभिनंदन करावे असे हे पाऊल आहे. देशातील प्रत्येकाला या धाडसी कारवाईचा अभिमान असायला हवा. पुन्हा भारताला ही कारवाई करायला भाग पाडू नका हा स्पष्ट संदेश या कारवाईतून पाकिस्तानला गेलेला आहे. दहशतवाद्यांच्या विरोधात ही कारवाई होती. त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या सैनिकांच्या विरोधात होती. परंतु एकही निरपराध माणूस त्यात मारला गेलेला नाही हे खरे रणकौशल्य आहे. भारतीय सैन्याला योग्य पाठबळ, स्वातंत्र्य आणि मुभा मिळाली तर ते वाट्टेल ते करू शकते हे यातून दिसून आले आहे. यापूर्वी पर्यंत दहशतवादी भारतात घुसल्यानंतर त़्यांचा शोध घेतला जायचा व त्यामध्ये भारताचे खूप नुकसान त्यांनी केलेले असायचे परंतु आता ते सीमेतून आत घुसण्यापूर्वीच त्यांना मारण्याची भूमिका भारताने घेतली आहे. हे खऱ्या अर्थाने नितीपरिवर्तन आहे. या पूर्वीच्या शासनाने ही भूमिका घेतली असती तर देशाची कमी नुकसान झाले असते. पाकिस्तान या कारवाई नंतर शांत बसणार नाही. त्यामुळे संपूर्ण राष्ट्राने यापुढे सावध असायला हवे. राष्ट्रीय एकात्मका आत्ताच खरे तर दिसायला हवी. त्यात राजकारण, मतभेद यांना थारा देऊ नये. पाकिस्तान नक्की काहीतरी करेल हे गृहीत धरून मतभेद विसरून एकदिलाने पाकिस्तानचा धडा शिकवण्यासाठी सज्ज रहावे. परत कोणत्याही राष्ट्राची आपल्याकडे मान वाकडी करून पाहण्याची हिंमत होऊ नये असा आपला दरारा असायला हवा. पाकिस्तानला आत्महत्याच करायची असेल तरच ते भारताविरोधात युद्ध पुकारतील. जेव्हा सर्जिकल स्ट्राईकसारखी कारवाई केली जाते तेव्हा सर्व प्रकारची तयारी अगोदरच केलेली असते. आपली तिन्ही दले त्यादृष्टीने सज्ज असणार आहेत. भारताला युद्ध नको आहे परंतु ते झालेच तर पाकिस्तानला त्याची खूप मोठी किंमत मोजावी लागेल हे मात्र नक्की