बंगळुरू : पश्चिम पाकिस्तानपासून पूर्व पाकिस्तानचे विभाजन करून १९७१ साली बांगलादेशची निर्मिती झाली असली तरी त्या योजनेची आखणी भारताने १९६५ सालापासूनच केली होती, असे नौदलाच्या दक्षिण कमांडचे प्रमुख अधिकारी व व्हाइस ॲडमिरल अनिलकुमार चावला यांनी म्हटले आहे.
१९७१च्या युद्धात भारताने पाकिस्तानावर मिळविलेला विजय व बांगलादेशची झालेली निर्मिती या घटनेच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त येलाहांका येथे आयोजिलेल्या समारंभात ते बोलत होते. बांगलादेश निर्मितीसंदर्भातील काही कागदपत्रांचा हवाला देऊन अनिलकुमार चावला यांनी सांगितले की, पाकिस्तानची गुप्तहेर संस्था आयएसआयचा ईशान्य भारतात हस्तक्षेप वाढला होता. या संघटनेकडून चितगावच्या डोंगराळ भागात नागा बंडखोरांना शस्त्र प्रशिक्षण देण्यात येत असे. त्यामुळे भारताने मुक्ती वाहिनीच्या सदस्यांना शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली होती.
चावला म्हणाले की, १९६९ साली काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली होती. तेव्हा इंदिरा गांधी यांना त्या पक्षातून काढून टाकण्यात आले होते. त्यानंतर त्यांना पंतप्रधानपदी कायम राखण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागले होते. या घडामोडींत भारताची बाजू काहीशी कमकुवत झाली होती. इंदिरा गांधी यांना विरोधक गुंगी गुडिया असे हिणवत असत. १९६९ साली पाकिस्तानमध्ये याह्याखान यांनी टिक्का खान यांच्याकडून सत्ता हिरावून घेतली. पश्चिम पाकिस्तानचे पूर्व पाकिस्तानवर वर्चस्व लादण्याचा याह्याखान यांचा प्रयत्न होता. त्यानुसार दोन्ही भागांसाठी त्यांनी १९७० साली एकत्रित सार्वत्रिक निवडणूक घेण्याची घोषणा केली.
अनिलकुमार चावला म्हणाले की, ३० जानेवारी १९७१ रोजी काश्मीरमधील फुटीरतावाद्यांनी इंडियन एअरलाइन्सच्या विमानाचे अपहरण करून ते लाहोरला नेले. तिथे खरी ठिणगी पडली. १९७१च्या मार्च महिन्यात शेख मुजीबूर रहमान यांनी पूर्व पाकिस्तान स्वतंत्र झाल्याची घोषणा केली व त्यानंतर एप्रिल महिन्यात भारत पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात उतरला. त्यानंतर अशा घटना घडत गेल्या की, भारताची दुर्गामाता अशी इंदिरा गांधी यांची ओळख साऱ्या जगाला झाली. (वृत्तसंस्था)
आता युद्धाची सर्व तंत्रे बदललीव्हाइस ॲडमिरल अनिलकुमार चावला म्हणाले की, युद्धनीतीच्या सर्व तत्त्वांचा अंगीकार करून १९७१च्या बांगलादेशचे युद्ध लढले गेले. आता परिस्थिती वेगळी आहे. युद्धाची सर्व तंत्रे आधुनिक तंत्रज्ञानामुळे बदलली आहेत. त्याचा विचार करून यापुढील युद्धे लढली जाणार आहेत.