नवी दिल्ली: गेल्या काही महिन्यांपासून भारत आणि चीनमधला तणाव वाढला आहे. काही दिवसांपूर्वी चिनी लष्कराच्या एका सैनिकाला भारतीय जवानांनी ताब्यात घेतलं होतं. या सैनिकाची भारतीय सैन्याकडून सुखरुप सुटका करण्यात आली आहे. काल रात्री भारतीय लष्करानं या सैनिकाला चिनी लष्कराच्या ताब्यात दिलं. भारतीय सैन्यानं चिनी सैनिकाची सुटका करावी, असं आवाहन चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीकडून करण्यात आलं होतं. या आवाहनाला भारताकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला आहे.काही गुराख्यांना रस्ता दाखवताना एका सैनिकानं प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडली आणि तो चुकून भारतीय हद्दीत गेला, असं चिनी लष्करानं म्हटलं होतं. पीपल्स लिबरेशन आर्मीच्या एका सैनिकाला पूर्व लडाखमधील डेमचोक सेक्टरमध्ये पकडण्यात आल्याची माहिती भारतीय लष्करानं सोमवारी दिली. हा सैनिक प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ भटकताना आढळून आला. बुधवारी भारतीय लष्करानं या सैनिकाला चीनच्या ताब्यात दिलं.
लडाखमध्ये पकडण्यात आलेल्या चिनी सैनिकाची घरवापसी; भारतीय लष्कराकडून सुखरुप पाठवणी
By कुणाल गवाणकर | Published: October 21, 2020 9:02 AM