नवी दिल्ली : जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी दोन तृतीयांश प्रदूषित शहरे भारतातील असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. या अहवालानुसार, जगातील सर्वाधिक अशुद्ध हवा असलेल्या ३० शहरांपैकी २१ शहरे भारतीय आहेत. चीनच्या शहरांनी आपल्या हवेच्या गुणवत्तेत सुधारणा केली असताना भारतीय शहरे मात्र अधिकाधिक प्रदूषित होत असल्याचेही अहवालातून समोर आले आहे.‘आयक्यूएअर एअर व्हिज्युअल्स’ या संस्थेने जारी केलेल्या ‘२०१९ जागतिक हवा शुद्धता अहवाला’त ही माहिती देण्यात आली आहे. अशुद्ध हवा असलेल्या सर्वोच्च १० शहरांतही ६ शहरे भारतातील आहेत, असे या अहवालात म्हटले आहे.राजधानी दिल्लीचे सॅटेलाईट शहर म्हणून ओळखले जाणारे गाझियाबाद जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर ठरले आहे. २०१९ मध्ये येथील हवेतील ‘पीएम २.५’ संचयन ११०.२ होते. अमेरिकी पर्यावरण सुरक्षा संस्थेने प्रमाणित केलेल्या पातळीपेक्षा हे प्रमाण दुपटीपेक्षा जास्त आहे. नोव्हेंबरमध्ये नवी दिल्लीतील हवा शुद्धता निर्देशांक ८०० पेक्षाही जास्त झाला होता, तेव्हा शहरात सार्वजनिक आरोग्य आणीबाणी जाहीर करण्यात आली होती. पीएम २.५ हे हवेतील अतिसूक्ष्म घातक कण मोजण्याचे परिमाण आहे. हे अतिसूक्ष्म कण फुफ्फुसात जाऊन श्वसन संस्था निकामी करतात.जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, प्रदूषित हवेमुळे जगात दरवर्षी ७ दशलक्ष लोकांचा अकाली मृत्यू होतो. शहरात राहणाऱ्या ८० टक्के लोकसंख्येला घातक हवेचा सामना करावा लागतो. प्रदूषित शहरांत दक्षिण आशियातील शहरांचे प्रमाण अधिक आहे. सर्वाधिक प्रदूषित ३० शहरांतील २७ शहरे भारत, पाकिस्तान आणि बांगलादेशातील आहेत. पाकिस्तानातील गुजरनवाला, फैसलाबाद आणि राईविंद ही शहरे पहिल्या १० सर्वाधिक प्रदूषित शहरांत आहेत. नवी दिल्ली, लाहोर आणि ढाका ही शहरे अनुक्रमे ५ व्या, १२ व्या आणि २१ व्या स्थानी आहेत. दक्षिण आशिया, आग्नेय आशिया आणि पश्चिम आशिया या भूभागातील ३५५ शहरांपैकी केवळ ५ शहरांनी जागतिक आरोग्य संघटनेचे वार्षिक उद्दिष्ट पूर्ण केले आहे. सर्वाधिक प्रदूषित देशांच्या यादीत भारत पाचव्या स्थानी आहे. या यादीत पहिले पाचही देश आशियातील आहेत.जगातील हवा प्रदूषण २0१९देश हवेची गुणवत्ता पीएम २.५ चे प्रमाणबांगलादेश अनारोग्यदायी ८३.३पाकिस्तान अनारोग्यदायी ६५.८मंगोलिया अनारोग्यदायी ६२अफगाणिस्तान अनारोग्यदायी ५८.८भारत अनारोग्यदायी ५८.१इंडोनेशिया अनारोग्यदायी ५१.७
जीव गुदमरतोय! जगातील ३० पैकी २१ सर्वाधिक प्रदूषित शहरं भारतात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2020 3:14 AM