नवी दिल्ली : भारतात कोरोना लसीकरण (Corona Vaccination) मोहीम वेगाने सुरू आहे. आतापर्यंत देशातील 95 कोटी लोकांना कोरोना लसीची दोन्ही डोस देण्यात आले आहेत. दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया (Mansukh Mandaviya) यांनी एक ट्विट केले आहे. यामध्ये म्हटले आहे की, जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम आपल्या देशात सुरू आहे. ज्याअंतर्गत आतापर्यंत 95 कोटीहून अधिक लोकांना कोरोना लस दिली गेली आहे. (India completes administration of 95 crore COVID-19 vaccine doses)
याचबरोबर, त्यांनी पुढे लिहिले आहे की, देश आता 100 कोटी लसींच्या डोसकडे वाटचाल करत आहे. 95 कोटीहून अधिक लोकांना लसीचे डोस मिळाल्यानंतर, भारत नियोजित वेळेपूर्वी 100 कोटी लसीच्या डोसचे लक्ष्य गाठेल, असे अपेक्षित आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने मार्च 2022 पर्यंत 100 कोटी कोरोना लसीचे डोस देण्याचे लक्ष्य ठेवले होते, परंतु आता जे आकडे समोर येत आहेत ते पाहता असे म्हणता येईल की हे लक्ष्य डिसेंबरपूर्वीच पूर्ण केले जाईल. याआधी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी 'वॅक्सिन मैत्री'साठी ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये अतिरिक्त लस निर्यात करण्याबाबत बोलले होते. ते म्हणाले होते की, देशातील नागरिकांच्या गरजा आधी आहेत, यानंतरच आम्ही निर्यात वाढवू.
विशेष म्हणजे, देशात 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांची लोकसंख्या सुमारे 94 कोटी आहे. प्रत्येक प्रौढ व्यक्तीच्या दोन डोसनुसार, सर्व प्रौढांना लसीकरण करण्यासाठी 188 कोटी डोस आवश्यक आहेत. लक्ष्य पूर्ण करण्यासाठी राज्यांना दररोज सरासरी 1.14 कोटी डोस द्यावे लागतील.
आरोग्य विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, राज्य सरकारांना जेवढे आवश्यक डोस लागतील, ते उपलब्ध करून दिले जातील. मात्र, डोसची उपलब्धता असूनही राज्यांमध्ये लसीकरणाचा वेग वाढत नाही. आतापर्यंत, देशातील 72 टक्के वयस्कर लोकांनी एक डोस घेतला आहे आणि सुमारे 25 टक्के वयस्कर लोकांना दोन्ही डोस मिळाले आहेत.