म्यानमारमध्ये काल मोठा भूकंप झाला. या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विनाशकारी भूकंपात मदत आणि बचाव कार्याला गती देण्यासाठी भारताने 'ऑपरेशन ब्रह्मा' अंतर्गत दोन नौदल जहाजे पाठवली आहेत. याशिवाय, शनिवारी एक फील्ड हॉस्पिटल देखील विमानाने आणले जाणार आहे.परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.
याबाबत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, या मानवतावादी मदत मोहिमेअंतर्गत, लवकरच आणखी दोन भारतीय नौदल जहाजे म्यानमारला पाठवली जातील. याशिवाय, विमानाने एक फील्ड हॉस्पिटल देखील पाठवले जाणार आहे, यामध्ये ११८ सदस्यांची वैद्यकीय टीम असेल. हे पथक शनिवारी आग्रा येथून म्यानमारला रवाना होईल.
'ऑपरेशन ब्रह्मा' अंतर्गत राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) ची टीम देखील तैनात केली जात आहे. भूकंपग्रस्त भागात मदत आणि बचाव कार्यासाठी टीम आधुनिक उपकरणांनी सुसज्ज आहे, यामध्ये मजबूत काँक्रीट कटर, ड्रिल मशीन, हातोडा आणि प्लाझ्मा कटिंग मशीन यांचा समावेश आहे.
पुढील २४-४८ तास महत्त्वाचे
गाझियाबाद येथील ८ व्या एनडीआरएफ बटालियनचे कमांडंट पीके तिवारी हे या अर्बन सर्च अँड रेस्क्यू टीमचे नेतृत्व करत आहेत. एनडीआरएफचे उपमहानिरीक्षक मोहसीन शहेदी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, पुढील २४ ते ४८ तास मदत कार्यासाठी खूप महत्वाचे असतील. या काळात, जास्तीत जास्त लोकांना मदत पोहोचवता यावी म्हणून टीमला मदत कार्यात सक्रियपणे सहभागी व्हावे लागेल.