मुंबई, दि. 1 - फोर्ब्सकडून आशिया खंडातील भ्रष्टाचारी देशांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या यादीत फोर्ब्सने आशिया खंडातील देशांमध्ये भारतात सर्वाधिक भ्रष्टाचार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे आशिया खंडातील भ्रष्टाचारी देशांच्या यादीत भारताला पहिलं स्थान देण्यात आलं आहे. या यादीत भारत पहिल्या क्रमांकावर आहे तर व्हिएतनामचा दुसरा नंबर लागतो. तीस-या क्रमांकावर थायलंड आहे तर भ्रष्टाचाराच्या बाबतीत पाकिस्तानचा चौथा नंबर लागतो.
ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलकडून याबाबत 18 महिने सर्वेक्षण करण्यात आले होते. भारतात भ्रष्टाचाराचे प्रमाण तब्बल 69टक्के असल्याचे सर्वेक्षण अहवालात नमूद करण्यात आले आहे. भारतात शाळा, रूग्णालय, ओळखपत्र, पोलीस क्षेत्रातील भ्रष्टाचाराचे प्रमाण सर्वाधिक आहे.
याबाबत मार्च 2017 चं वृत्त फोर्ब्सने ट्वीटरवर शेअर केलं आहे. ही यादी फोर्ब्सने ट्विटरवर जाहीर केल्यानंतर सोशल मीडियामध्ये चर्चेला उधाण आलं आहे. फोर्ब्सचं हे ट्विट आम आदमी पक्षाच्या कुमार विश्वास यांनी रिट्विट केलं आणि त्यानंतर अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. पहिलेच सांगितलं होतं ना नंबर वन बनवेल, बघा बनवलंच असं ट्विट त्यांनी केलं.