नवी दिल्ली : डेंग्यू या आजारावरील लस भारतात तयार करण्यात आली असून, तिच्या अंतिम चाचण्यांची प्रक्रिया आता सुरू होईल. त्याचे निष्कर्ष आगामी दोन वर्षांमध्ये हाती येतील. ते सकारात्मक असल्यास या लसीच्या वापरास मंजुरी दिली जाईल. ही माहिती इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे संचालक डॉ. राजीव बहल यांनी दिली.
त्यांनी ‘ड्रग रेग्युलेटरी ऑथॉरिटीज इंडिया-२०२४’ या कार्यक्रमात सांगितले की, डेंग्यूवरील लस बनविण्याचा अमेरिकेतील एनआयएच कंपनीनेही प्रयत्न केला होता. मात्र त्यात तिला यश आले नव्हते. आता भारतात या प्रकारची लस तयार करण्यात आली असून तिच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांना ड्रग कंट्रोलर जनरलने मंजुरी दिली आहे. या लसीच्या निर्मितीत आयसीएमआरने सहकार्य केले आहे. तसेच आणखी एक लस भारतात बनविण्यात येत आहे.