नवी दिल्ली- काही आठवड्यांपूर्वी भारताने केलेल्या पाकिस्तानमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राइक्सबाबत शंकाकुशंका निर्माण केल्या जात असतानाच, यापूर्वीही गेल्या अठरा वर्षांमध्ये भारताने दहा वेळा पाकिस्तानात घुसून कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, यातील एकही कारवाई भारत सरकारने या वेळसारखी जगजाहीर केली नव्हती. मात्र, भारत हल्ले करत असल्याचा कांगावा अनेक वेळा करून पाकिस्ताननेच याचे पुरावे जगासमोर आणले होते. अठरा वर्षांपूर्वी मे १९९८ मध्ये पाकिस्तानने संयुक्त राष्ट्राकडे भारताने आमच्या भूमित येऊन हल्ला केल्याचा कांगावा केला होता. भारताने आमच्या २२ सैनिकांना ठार मारल्याचे पाकने म्हटले होते, शिवाय भारतीय सैनिकांनी आमच्या हद्दीत धमक्यांचे पत्र सोडले होते, असेही पाकने म्हटले होते. भारताने हा हल्ला केला होता. कारण आठवडाभरापूर्वी पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय हद्दीतील पठाणकोट आणि ढाकीकोट भागातील २६ नागरिकांचा जीव घेतला होता. कारगिल युद्ध सुरू होते, त्या वेळी म्हणजेच १९९९ साली भारतीय सैनिकांनी जम्मूतील नियंत्रणरेषा पार करून पाक सैनिकांवर हल्ला चढविला होता.वर्षभराने म्हणजे २००० साली भारतीय सैन्याने पाकिस्तानातील नीलम नदी परिसरात जाऊन सात पाक सैनिकांना ठार मारल्याचा कांगावा पाकनेच केला होता. काही दिवसांपूर्वीच भारताच्या जाट रेजिमेंटचे कॅप्टन सौरभ कालिया आणि पाच सैनिक पाकिस्तानच्या हल्ल्यात शहीद झाले होते. त्याचा बदला घेण्यासाठी भारताने सीमा ओलांडून हल्ला चढविला. मार्च २००० मध्ये भारताच्या इन्फन्ट्री बटालियनच्या जवानांनी नियंत्रणरेषा ओलांडून पाकिस्तानी चौक्यांवर हल्ले केले. कारण या हल्ल्याच्या आठवडाभरापूर्वीच पाकने भारतीय जवानांना लक्ष्य केले होते. भारताच्या इन्फन्ट्री बटालियनच्या या कॅप्टनला नंतर शौर्य पुरस्काराने गौरविण्यात आले होते. लष्कर ए तय्यबाच्या अतिरेक्यांनी २० मार्च २००० रोजी अनंतनाग जिल्ह्यातील छत्तीसिंगपोरा येथे हल्ला करून ३५ शिखांची हत्या केली. त्यानंतर, लगेच काही आठवड्यांनी भारतीय लष्कराच्या विशेष दलाच्या नवव्या तुकडीने सीमापार मोठे आॅपरेशन राबविले होते. या आॅपरेशनला वाजपेयी सरकारनेच परवानगी दिली होती आणि त्यात २८ पाक सैनिक व अनेक दहशतवादी यमसदनी धाडण्यात आले होते.भारतीय सैनिकांनी १८ सप्टेंबर २००३ रोजी बोराह सेक्टरमध्ये असलेल्या पाकिस्तानी चौकीवर हल्ला करून एक अधिकारी आणि तीन सनिकांनी मारल्याचा कांगावा पाकनेच केला होता.भारताने हल्ला करून चार पाकिस्तानी सैनिकांना मारल्याची तक्रार पाकने जून 2008मध्ये केली होती.भारतीय सैन्याने ३० आॅगस्ट २०११ रोजी शारदा सेक्टरमध्ये असलेल्या पाकिस्तानी चौक्यांवर हल्ला करून, तीन सैनिक मारल्याचे पाकिस्तानने म्हटले होते. जानेवारी २०१३ मध्ये सवान पत्रा भागातील चौकीवर भारताने हल्ला केल्याचे पाकने म्हटले होते.२९ सप्टेंबर २०१६ रोजी भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून ३५ हून अधिक अतिरेकी ठार मारले, तर अनेक पाकिस्तानी सैनिकांना यमसदनी धाडले.
पीओकेमधील रहिवासी म्हणतात, ‘आमचे जगणे नरक!’पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणाऱ्या वाढत जाणाऱ्या तळांमुळे आमचे दैनंदिन जगणे नरकासमान बनले आहे, अशी व्यथा तेथील रहिवाशांनी बोलून दाखविली. ही व्यथा पाकव्याप्त काश्मीरमधील मुजफ्फराबाद, कोटली, चिनारी, मिरपूर, गिलगिट, दियामेर आणि नीलम खोरे येथील रहिवाशांनी गुरुवारी येथे पाकिस्तान सरकारच्या निषेधार्थ निदर्शने केली, तेव्हा बोलून दाखविली.