संयुक्त राष्ट्रे - वातावरणातील बदलांमुळे येत असलेल्या नैसर्गिक आपत्ती ही जगासमोरील गंभीर समस्या बनली आहे. दरम्यान, गेल्या 20 वर्षांमध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तींमुळे भारताचे तब्बल 79.5 अब्ज डॉलर सुमारे 59 खर्व रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. संयुक्त राष्ट्रांनी आपल्या एका अहवालामधून ही माहिती दिली आहे. 'आर्थिक नुकसान, गरिबी आणि आपत्ती: 1998-2017' या नावाने संयुक्त राष्ट्रांनी एक अहवाल प्रसिध्द केला आहे. या अहवालात वातावरणातील बदल आणि नैसर्गिक घटनांमुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर झालेल्या परिणामांचा अभ्यास करण्यात आला आहे. हा अहवाल संयुक्त राष्ट्रांच्या आपत्ती निवारण विभागाने तयार केला आहे. 1998 ते 2017 या काळात वातावरणातील बदलांमुळे येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींमुळे होणाऱ्या थेट आर्थिक नुकसानामध्ये 151 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यादरम्यान नैसर्गिक आपत्तींमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे 2 हजार 908 अब्ज डॉलर एवढे नुकसान झाले आहे. हे नुकसान गेल्या दोन दशकांमध्ये झालेल्या नुकसानापेक्षा अधिक आहे. वातावरणातील बदलांचा धोका वाढला आहेत तसेच आर्थिक नुकसानामध्येही वातावरणातील घटनांमुळे होणाऱ्या नुकसानाचे प्रमाण सुमारे 77 टक्के आहे. म्हणजेच सुमारे 1 लाख 66 हजार 477 रुपयांचे नुकसान वातावरणातील आपत्तींमुळे होते.
नैसर्गिक आपत्तींमुळे गेल्या 20 वर्षांत भारताचे झाले तब्बल 59,00,00,00,00,000 रुपयांचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2018 1:46 PM