नवी दिल्ली - देशाच्या अर्थव्यवस्थेवरुन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर सडकून टीका करणारे भाजपाचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी आता काश्मीर मुद्यावर मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. भारतानं काश्मीर खो-यातील लोकांना भावनिकदृष्ट्या गमावले आहे, असे सिन्हा म्हणाले आहेत. शिवाय, काश्मीर समस्येमध्ये पाकिस्तान हा अवश्य तिसरा पक्ष, ही बाब नाकारता येऊ शकत नाही, असे सांगत सिन्हा यांनी पुन्हा एकदा स्वतःच्याच पक्षाला पुन्हा एकदा टार्गेट केले आहे. शिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही हल्लाबोल केला आहे.
'द वायर'ला दिलेल्या मुलाखतीत सिन्हा यांनी काश्मीर मुद्यावरुन मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. सिन्हा असेही म्हणालेत की, मी जम्मू काश्मीरमधील लोकांचं मोठ्या प्रमाणात विभाजन होत असल्याचे दिसत आहे. ही गोष्टी माझ्यासाठी फार त्रासदायक आहे. तिथल्या लोकांमध्ये दुरावलेपणाची भावना आहे. आपण त्या लोकांना भावनिकदृष्ट्या गमावून बसलो आहे. तेथील परिस्थिती समजून घेण्यासाठी तुम्हाला काश्मीर खो-याला भेट द्यावी लागेल व तेव्हा तुम्हाला हे लक्षात येईल की त्यांचा आपल्यावर विश्वास राहिलेला नाही.
काश्मीर मुद्यावर चर्चा करण्यासाठी मोदींकडे मागितली होती वेळ नियंत्रण रेषेवर होणा-या हल्ल्यात लोकांच्या बळी जाण्याच्या घटना कमी व्हायला पाहिजेत, कारण तेथे कुणीही युद्ध जिंकत नाहीय. संपूर्ण जग या मुद्यावर पाकिस्तानसोबत नाही तर भारतासोबत आहे, हे कारगिलमुळे सिद्धदेखील झाले आहे. तुम्ही नियंत्रण रेषांना बदलू शकत नाहीत. पाकिस्तानसोबत आपले अनेक मुद्यांवर मतभेद असेल तरीही नियंत्रण रेषेवर शांतता प्रस्थापित करता येऊ शकते. दरम्यान सिन्हा यांनी असा दावा केला आहे की, 10 महिन्यांपूर्वी त्यांनी काश्मीर मुद्यावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे वेळ मागितली होती. मात्र त्यांना वेळ मिळाली नसल्याचे त्यांनी दुःख आहे, असेही ते म्हणालेत.
वेळ निघून गेलीय
मी खरंच खूप दुःखी आहे. राजीव गांधींपासून भारतातील कोणत्याही पंतप्रधानांनी मला भेटीसाठी वेळ देण्यास कधीही नकार दिला नाही. माझ्याकडे तुमच्यासाठी वेळ नाही, असे कोणत्याही पंतप्रधानांनी यशवंत सिन्हांना म्हटले नाही आणि हे माझे स्वतःच्याच पंतप्रधानांनी भेटीसाठी वेळ दिली नाही. अशा परिस्थितीत पुढील काळात जर कुणी मला फोन करुन म्हणत असेल की कृपया मला येऊन भेटा. तर मला माफ करा. वेळ निघून गेली आहे. मला वाईट वागणूक दिली गेली, अशी खंत यावेळी सिन्हा यांनी व्यक्त केली.
अरुण जेटलींनी अर्थव्यवस्था खड्ड्यात घातली!
अरुण जेटली हे ‘सुपरमॅन’ आहेत, असे समजून वित्त मंत्रालयासह चार मोठ्या खात्यांचा कार्यभार त्यांच्याकडे देण्यात आला. परंतु कामाच्या प्रचंड बोजामुळे जेटली वित्त मंत्रालयास न्याय देऊ न शकल्याने त्यांनी देशाची अर्थव्यवस्था खड्ड्यात घातली, अशी सडेतोड टीका ज्येष्ठ भाजपा नेते यशवंत सिन्हा यांनी काही दिवसांपूर्वी केली होती.
‘इंडियन एक्स्प्रेस’ या दैनिकात, ‘आता मला बोलायलाच हवे,’ या शीर्षकाने लेख लिहून सिन्हा यांनी अर्थव्यवस्थेची सद्य:स्थिती व ही अवस्था का आली, यावर परखड भाष्य केले आहे. जेटली यांनी वित्तमंत्री म्हणून सूत्रे हाती घेतली, तेव्हा परिस्थिती खूपच अनुकूल होती. पण त्यांना हे काम झेपले नाही. वित्त मंत्रालयाचे काम मंत्र्याला अहोरात्र काम करूनही उरकणार नाही, एवढे असते. यासाठी पूर्णवेळ व लक्ष देण्याची गरज असते. पण एकाच वेळी चार मंत्रालयांचे काम सांभाळणारे जेटली ते करू शकले नाहीत. लोकसभा निवडणुकीत पक्षाला याचा फटका बसणे अपरिहार्य असल्याचे भाकित करून सिन्हा म्हणतात, की अर्थव्यवस्था उभारण्यापेक्षा ती खिळखिळी करणे सोपे असते. निवडणूक प्रचारात थापा पचतात. पण एका रात्रीत अर्थव्यवस्थेला उभारी येईल, अशी जादुची कांडी कोणाकडेही नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपर्यंत अर्थव्यवस्था बाळसे धरू शकत नाही. अत्यंत कडवट भाषेत समारोप करताना सिन्हा लिहितात, की आपण गरिबी फार जवळून पाहिली, असे पंतप्रधान सांगतात. त्यांच्याप्रमाणेच सर्व भारतीयांनाही गरिबीचे चटके बसावेत, यासाठी त्यांचे वित्तमंत्री (जेटली) जिवाचे रान करीत आहेत!