नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जर्मनीच्या चान्सलर एंजेला मर्केल यांच्यादरम्यान सोमवारी नवी दिल्ली येथे झालेल्या द्विपक्षीय चर्चेनंतर सामरिक क्षेत्रांमधील संबंध विस्तारित करण्यासाठी उभय देशांनी एकूण १८ सामंजस्य करारांवर (एमओयू) स्वाक्षरी केली. या सामंजस्य करारांमध्ये जर्मनी कंपन्यांना वेगाने मंजुरी देणे आणि जर्मनीतर्फे एक अब्ज युरोच्या सौर ऊर्जा निधीच्या घोषणेचा समावेश आहे.मोदी आणि मर्केल यांनी तिसऱ्या शिखरस्तरीय आंतर-सरकारी चर्चेचे सह-अध्यक्षपद भूषविताना संरक्षण, सुरक्षा, गुप्तचर माहिती, रेल्वे, व्यापार, गुंतवणूक आणि स्वच्छ ऊर्जा यांसारख्या प्रमुख क्षेत्रांतील संबंध विस्तारित करण्यावर सहमती दर्शविली आणि दहशतवादाच्या धोक्याशी एकत्रितपणे लढण्याचा निर्धार व्यक्त केला.मोदी यांनी मर्केल यांच्यासमवेत प्रतिनिधीमंडळस्तरीय आणि समोरासमोर तीन तासांपेक्षा अधिक वेळ चर्चा केली. या चर्चेनंतर संयुक्तरीत्या मीडियाला संबोधित करताना मोदी म्हणाले, ‘भारताचा आर्थिक कायापालट करण्याचे ध्येय गाठण्यात जर्मनीला आम्ही नैसर्गिक भागीदार म्हणून बघतो. आर्थिक संबंधांकडे आमचे अधिक लक्ष आहे. तथापि असीमित आव्हाने आणि संधीच्या या जगात भारत आणि जर्मनी जगासाठी अधिक मानवीय, शांतीपूर्ण, न्यायोचित आणि टिकावू भविष्य निर्माण करण्यात बळकट भागीदार बनू शकतात, असा माझा विश्वास आहे.’जर्मन कंपन्यांसाठी फास्ट-ट्रॅक मंजुरी प्रक्रियेवरील सामंजस्य करारात विविध प्रकल्पांसाठी एकल बिंदू मंजुरीचाही समावेश आहे. अधिकाधिक जर्मन कंपन्यांना मोदींच्या महत्त्वाकांक्षी ‘मेक इन इंडिया’ योजनेशी जोडणे आणि त्यांना गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहित करणे हा यामागचा हेतू आहे.‘संरक्षण उत्पादन, आधुनिक तंत्रज्ञानात व्यापार, गुप्तचर माहिती आणि दहशतवादाचा मुकाबला करण्याच्या क्षेत्रात आमचे सहकार्य वाढीस लागेल. हे आमच्या विस्तारित होत असलेल्या संबंधांच्या महत्त्वपूर्ण सुरक्षेचे परिमाण आहे,’ असेही मोदी म्हणाले.भारत आणि जर्मनी या दोन देशांनी आपले द्विपक्षीय संबंध एका नव्या शिखरावर नेताना कौशल्य विकास, रेल्वे, विज्ञान व तंत्रज्ञान, शिक्षण, स्वच्छ ऊर्जा आणि कृषीसह अनेक महत्त्वाच्या क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने १८ सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केली. मर्केल आणि मोदी यांच्यादरम्यान नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊस येथे पार पडलेल्या चर्चेनंतर या सामंजस्य करारांचे आदानप्रदान करण्यात आले. जर्मन भाषेला भारतात आणि आधुनिक भारतीय भाषांना जर्मनीत प्रोत्साहन देण्यासाठी उभय देशांमध्ये एक करार करण्यात आला.जर्मनीने परत केली दुर्गामातेची मूर्तीकाश्मीरमधील एका मंदिरातून २० वर्षांपूर्वी चोरी गेलेली दहाव्या शतकातील दुर्गा मातेची मूर्ती जर्मनीने अखेर भारताला परत केली. ही मूर्ती चोरी गेल्यानंतर ती जर्मनीत सापडली होती.भारताच्या दौऱ्यावर आलेल्या जर्मनीच्या चान्सलर एंजेला मर्केल यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या द्विपक्षीय चर्चेनंतर ही मूर्ती मोदींच्या स्वाधीन केली. काश्मिरातून चोरलेली ही मूर्ती तीन वर्षांपूर्वी जर्मनीच्या स्टुटगार्त येथील लिंडन संग्रहालयात आढळली होती. मूर्ती परत केल्याबद्दल मोदी यांनी मर्केल आणि जर्मनीच्या जनतेचे यांचे आभार व्यक्त केले. ‘जम्मू-काश्मीरमधील ही मूर्ती चांगल्या गोष्टींचा वाईट गोष्टींवरील विजयाचे प्रतीक आहे,’ असे मोदी म्हणाले. महिषासुरमर्दिनी अवतारातील दुर्गामातेची ही मूर्ती १९९० मध्ये काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील एका मंदिरातून चोरीला गेली होती. त्यानंतर २०१२ मध्ये ही मूर्ती स्टुटगार्त येथील लिंडन संग्रहालयात दिसल्याचे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला कळविण्यात आले होते. तेव्हापासूनच भारत सरकारने ही मूर्ती परत मिळविण्याचा प्रयत्न चालविलेला होता. पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या दोन अधिकाऱ्यांनी गेल्या वर्षी स्टुटगार्तला भेटही दिली होती.ही मूर्ती चोरण्यामागे कुख्यात सुभाष कपूरचा हात असल्याचा संशय होता. कपूरला २०११ मध्ये जर्मनीत अटक करण्यात आली होती. कपूरच्या ‘आर्ट आॅफ दि पास्ट’ गॅलरीमधूनच ही मूर्ती खरेदी करण्यात आल्याचा संशय आहे.
जर्मनीकडून भारताला सौर ऊर्जेसाठी एक अब्ज युरो
By admin | Published: October 06, 2015 4:45 AM