लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्थेचा ढाचा भक्कम असला तरीही वाढत्या ‘विभाजन’ आणि ‘ध्रुवीकरण’मुळे देशाच्या विकासाचा ‘पाया’ खराब होत आहे. भारतात सध्या सर्वांत मोठे आव्हान बेरोजगारी आहे. बेरोजगारी दर २४ टक्क्यांच्यावर पोहोचला असून, तो जगात सर्वाधिक आहे, असे जागतिक बँकेचे माजी अर्थतज्ज्ञ कौशिक बसू यांनी मंगळवारी सांगितले.
कोणत्याही देशाचा विकास केवळ आर्थिक धोरणांवर अवलंबून नाही. राष्ट्राच्या आर्थिक यशामध्ये लोकांमधील विश्वास हा महत्त्वाचा घटक आहे. सध्या भारतीय समाजात विभाजन आणि ध्रुवीकरण वाढत आहे. हे केवळ खेदजनकच नाही तर देशाच्या विकासाच्या पायालाही हानी पोहोचवत आहे, असे अर्थतज्ज्ञ बसू यांनी म्हटले आहे. बसू यांच्या मते, मोठा उद्योजक वर्ग, अधिक कुशल कामगार आणि जीडीपी (एकूण देशांतर्गत उत्पादन) गुणोत्तरामध्ये जास्त गुंतवणूक यामुळे भारताचा पाया मजबूत आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून कुशल कामगारांची संख्या कमी होत आहे. त्याचा फटका देशाला बसू शकतो.भारतातील महागाईचे कारण जागतिक आहे. कोरोना महामारी आणि युक्रेनमधील युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने महागाई वाढली आहे. हे भारताच्या नियंत्रणात नसले तरीही गरीब आणि मध्यमवर्गीयांना यापासून वाचविण्यासाठी कोणतीही पुरेशी पावले उचलली जात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.
लहान व्यापारी, कामगार व शेतकऱ्यांना थेट मदत द्या!देशात किरकोळ महागाईत मोठी वाढ झाली आहे. आपण गेल्या २४ वर्षांत महागाई वाढल्याचे पाहिले नाही. सध्या जे काही होत आहे ते १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धाची आठवण करून देत आहे. त्यावेळी पूर्व आशियाई संकटाचा परिणाम भारतात होऊ लागला होता. महागाई आणखी वाढत जाणार असून, सरकारने तातडीने पावले उचलायला हवीत. लहान व्यापारी, कामगार आणि शेतकऱ्यांना थेट आणि तातडीची मदत देण्याची गरज असल्याचे बसू यांनी म्हटले आहे.