गेल्या काही दिवसांपासून देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. अशा परिस्थितीत आरोग्य व्यवस्थेवरही ताण येत आहे. दरम्यान, केंद्र सरकारला कोरोना व्यवस्थापनावर सल्ला देणाऱ्या टास्क फोर्सच्या सदस्यांनी देशव्यापी लॉकडाऊन लावण्याचा सल्ला केंद्र सरकारला दिला आहे. व्हि.के. पॉल हे या टास्क फोर्सचे प्रमुख असून ते थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यासंदर्भातील माहिती देतात. टास्क फोर्समध्ये एम्स आणि आयसीएमआरसारख्या संस्थांच्या तज्ज्ञांचा समावेश आहे. सध्या देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा परिस्थितीत त्वरित या संसर्गाची साखळी तोडण्याची आवश्यतता असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. आरोग्य व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात ताणही आलेला आहे. जर दररोज वाढणाऱ्या संसर्गाचा वेग असाच काम राहिला तर आरोग्य व्यवस्थेची स्थिती अधिक वाईट होऊ शकते. व्यवस्था वाढवण्यासाठीही एक मर्यादा असते. अशा परिस्थितीत आपल्याला संसर्गाची संख्या कमी करावी लागेल आणि ती साखळी तोडावी लागेल. एकमेकांच्या संपर्कात आल्यानं कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो. देशव्यापी लॉकडाऊन लावल्यास कोरोनाची साखळी तुटेल आणि रुग्णांच्या संख्येत होणारी मोठी वाढही कमी होईल, असं सदस्य़ांनी म्हटलं आहे. इंडियन एक्स्प्रेसनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
आपण चुकीच्या दृष्टीकोनातून पाहतोय"आम्ही गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं सांगत आहोत की लोकांना लॉकडाऊन हा किती महत्त्वाचा आहे हे सांगितलं जावं. सध्या आपण जसा थोडा थोडा करतोय तसा नाही, तर देशव्यापी लॉकडाऊन हवा. कोरोनाचा संसर्ग संपूर्ण देशात वाढत आहे," असं एका सदस्यानं बोलताना सांगितलं."आपण या परिस्थितीकडे चुकीच्या दृष्टीकोनातून पाहत आहोत. आरोग्य व्यवस्थेची वाढ करण्यासाठी उत्तम करण्यासाठी एक मर्यादा असते. आपण ऑक्सिजनचा पुरवठा सुधारला आहे. परंतु रुग्णांची वाढती संख्या पाहता आताही ऑक्सिजनची कमतरता आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव एकातून दुसऱ्या व्यक्तीत होते. अशा लॉकडाऊन करून संक्रमणाची साखळी तोडणं हा योग्य रस्ता आहे," असं आणखी एका सदस्यानं बोलताना सांगितलं.